देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
भव्य नाट्यगृह, पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प आणि पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी प्रयत्न
सिंधुदुर्गनगरी :
देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. देवगड-जामसंडे शहराला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने भव्य नाट्यगृह, आधुनिक पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तसेच पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
देवगड शहरात शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड तहसीलदार शीतल जाधव, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, महिला बालकल्याण सभापती सौ.अनुराधा नारकर, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, बाळ खडपे, संजय बोंबडी, योगेश चांदोसकर, वैभव कलंगुटकर, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल, प्र. उपविभागीय अभियंता शैलेश मोरस्कर व सहायक अभियंता प्रणव देसाई उपस्थित होते.
राणे म्हणाले, गेल्या बारा वर्षांत देवगडकरांनी जी मागणी केली, ती पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. विरोधी पक्षात असतानाही शासकीय निधीची वाट न पाहता स्वतःच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे मार्गी लावली. देवगडकरांच्या विश्वासामुळेच आज राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली असून, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी पवनचक्की परिसरातील गार्डन, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम, क्रीडा संकुल, अभ्यासिका आणि आता नाट्यगृह उभारण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. अशा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रभरातून पर्यटक देवगडमध्ये येत असून स्थानिक बाजारपेठेला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राणे यांनी अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य करत, देवगडसाठी असा कोणताही प्रस्ताव निश्चित झालेला नसून हा विषय संपलेला आहे, असे स्पष्ट केले. अफवा पसरवून गुंतवणुकीसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
देवगडमध्ये पर्यावरणपूरक उद्योगांनाच प्राधान्य दिले जाईल, असे सांगत त्यांनी लवकरच दोन बोटबिल्डिंग कारखाने सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवगडचा विकास वेगाने करण्यासाठी देवगड–ओरस दरम्यान केवळ ४० मिनिटांत प्रवास होईल असा नवीन रस्ता उभारण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर पुढे नेला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी ११० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून कामाला गती दिल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी विरोधकांवर टीका करताना राणे म्हणाले की, अनेक वर्षे सत्ता असूनही रोजगारनिर्मिती किंवा मोठे उद्योग आणण्यात अपयश आले. मात्र सध्याचे सरकार देवगड आणि सिंधुदुर्गच्या विकासासाठी झपाट्याने काम करत असून पर्यटन, बंदरे, रस्ते आणि उद्योगांच्या माध्यमातून तालुक्याचे चित्र बदलण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सामाजिक संस्था, युवक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षभेद विसरून देवगडच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. विकासाच्या कामात राजकारणाऐवजी सहकार्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
युवकांनी विकासासाठी आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीचे कौतुक करत, जागरूक तरुण हीच देवगडच्या उज्ज्वल भविष्यातील सर्वात मोठी ताकद असल्याचे राणे यांनी सांगितले. त्यांनी देवगडकरांना विकासाच्या प्रवासात सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत, निधी आणि विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की सर्वप्रथम कार्यक्रमाला शुभेच्छा देत आयोजकांचे आणि गणेशपूजन करण्याची संधी दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते नाट्यकेंद्राच्या भूमिपूजनाचा शुभारंभ झाल्याचा आनंद व्यक्त करत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या भागाच्या विकासासाठी प्रशासनाचे दूरदृष्टीचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात नाट्यप्रेमी, कलाकार आणि रसिकांची संख्या मोठी असल्याने येथे नाट्यकेंद्र उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले. हे नाट्यकेंद्र परिसराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देईल, असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. बी. बागुल यांनी केले. नाट्यगृह उभारणी करून स्वप्न पूर्ण केले म्हणून यावेळी देवगड पर्यटन समितीतर्फे प्रमोद नलावडे तसेच युथ फोरम तर्फे सिद्धेश माणगावकर व इतर यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले.
