राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
५०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध इनडोअर क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चे आज दिमाखदार वातावरणात उद्घाटन करण्यात आले. राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. यंदाच्या स्पर्धेत जिल्हाभरातून ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.
नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित या स्पर्धेत कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा विविध इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, रामराजा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य नगराध्यक्ष चषकाच्या माध्यमातून होत असून, ही परंपरा जपण्यासाठी क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांचे विशेष कौतुक आहे.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी, बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढे नेण्याबरोबरच क्रीडा गुणांना वाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्पर्धेमुळे होत असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या, शालेय अभ्यासासोबतच खेळात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या चषकाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे.
दरम्यान, राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी आयोजकांचे कौतुक करत स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी सावंतवाडीतून अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविल्याचे सांगत, खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच स्पर्धेच्या परीक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेवक दुलारी रांगणेकर, निलम नाईक, ॲड. सायली दुभाषी, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देवा टेमकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, चित्रकार अक्षय सावंत, संतोष मोरजकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती प्रतीक बांदेकर यांनी केले. गजानन परब यांनी सूत्रसंचालन केले, तर क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
