पीक पाहणीच्या कामातून पोलीस पाटलांना तात्काळ मुक्त करा; सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेची मागणी
तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर; नियमबाह्य महसुली कामांचा भार टाकू नये, अन्यथा आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देत पोलीस पाटलांवर लादण्यात येणाऱ्या अतिरिक्त महसुली कामांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः पीक पाहणीसारख्या कामातून पोलीस पाटलांना तात्काळ मुक्त करावे, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
गावपातळीवर पोलीस पाटील हे कायदा व सुव्यवस्था राखणे, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधणे तसेच गावातील वाद-विवाद शांततेत सोडविणे ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मूळ कर्तव्यांशी संबंध नसलेली महसुली कामे त्यांच्यावर लादणे अयोग्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६० मधील पोलीस पाटील यांच्या विहीत कर्तव्यांमध्ये पीक पाहणीचा समावेश नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले. तसेच शासनाच्या संबंधित परिपत्रकातही पीक पाहणीसाठी सहाय्यक म्हणून पोलीस पाटील यांचा कोणताही उल्लेख नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करताना सर्पदंश, वन्य प्राण्यांचा धोका तसेच जमिनीच्या वहिवाटीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस पाटलांकडून अशी कामे करून घेणे धोकादायक असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे पोलीस पाटलांवरील नियमबाह्य महसुली कामांचा भार तातडीने हटवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन नाईक (मडुरे), जिल्हा उपाध्यक्ष व तालुका सचिव लक्ष्मण गावकर (ओटवणे), प्रांत समिती अध्यक्ष जागृती गावडे (इन्सुली), सावंतवाडी-बांदा अध्यक्ष श्रीपाद ठाकूर (नाणोस), प्रशांत पंडित (कास), उपाध्यक्ष बाबू परब (बावळाट) यांच्यासह तालुक्यातील अनेक पोलीस पाटील उपस्थित होते.
