जखमी माकडाच्या पिल्लाला मिळाले जीवदान; तत्परतेने केले रेस्क्यू
अजित नाडकर्णी यांच्या पुढाकाराने वनविभागाची तातडीची कारवाई; उपचारासाठी पिल्लाला वन कार्यालयात हलविले
सावंतवाडी
प्राणिमात्रांवर दया करण्याचा संदेश देणारी घटना सावंतवाडी परिसरात घडली. जखमी अवस्थेत निपचित पडलेल्या माकडाच्या पिल्लाला सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. नांडोस्कर यांच्या घरासमोर माकडाचे एक पिल्लू आजारी अवस्थेत पडलेले आढळले. त्यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्याशी संपर्क साधला. नाडकर्णी यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वन अधिकारी सारीक फकीर भाऊसाहेब यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पिल्लाचे रेस्क्यू केले.
जखमी पिल्लाला पुढील उपचारासाठी वन विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर औषधोपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली.
या मदतीबद्दल श्री. नांडोस्कर यांनी अजित नाडकर्णी यांचे आभार मानले. यावेळी नाडकर्णी म्हणाले, “आज शनिवारच्या दिवशी माझ्या हातून एक चांगले कार्य घडल्याचा आनंद आणि अभिमान आहे. मुसळधार पावसाच्या काळात या मुक्या जीवाला वेळेत उपचार मिळाले, ही समाधानाची बाब आहे.” त्यांनी या तत्पर कारवाईबद्दल वन विभागाच्या अधिकाऱ्यांचेही विशेष आभार व्यक्त केले.
