सावंतवाडीत जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
बापूसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग; राजेसाहेब खेमसावंत भोसले व राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी
पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चा शुभारंभ शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानावरील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या उद्घाटन सोहळ्यात राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाभरातून ५०० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
या क्रीडा महोत्सवांतर्गत कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा विविध इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून बापूसाहेब महाराजांचा वारसा जपण्याचे कार्य होत असल्याचे सांगत क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांचे कौतुक केले. उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे नमूद केले.
नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन मिळावे आणि बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक करत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी सावंतवाडीने अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविल्याचा उल्लेख करत, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले.
उद्घाटन सोहळ्यात क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवसही मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. तसेच स्पर्धांचे परीक्षक म्हणून कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक बांदेकर यांनी केले, सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले, तर आभार क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी मानले.
