You are currently viewing मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – मंत्री नितेश राणे
Oplus_16908288

मुंद्रा बंदराच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – मंत्री नितेश राणे

*मंत्री नितेश राणे यांनी अदानी पोर्टचे करण अदानी यांच्यासमवेत केली मुंद्रा पोर्टची पाहणी*

 

मुंबई :

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्रातील बंदरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक व आधुनिक बनविण्यासाठी ही अभ्यासपूर्ण भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

या दौऱ्यात मंत्री नितेश राणे यांनी बंदरातील अत्याधुनिक कंटेनर हाताळणी व्यवस्था, यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मालवाहतूक व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, साठवण सुविधा, जहाजांच्या जलद हालचालीसाठी विकसित करण्यात आलेली यंत्रणा तसेच विविध पायाभूत विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. बंदरातील कार्यक्षम नियोजन, वेगवान सेवा आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे मुंद्रा पोर्टने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण गौतम अदानी उपस्थित होते. त्यांच्यासमवेत बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, खाजगी गुंतवणुकीच्या संधी तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बंदर क्षेत्राची वाढती भूमिका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी बळकट करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढविणे आणि बंदरांशी संलग्न औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या विविध बाबींवरही विचारविनिमय झाला.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील. यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

मुंद्रा पोर्टच्या अभ्यास दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवीन दिशा मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांच्या माध्यमातून राज्यातील बंदरांना अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा