You are currently viewing दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

कलाकारांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; ‘दिधले दान सौभाग्याचे’ नाट्यप्रयोगाने रंगली सांगता

साटेली-भेडशी प्रतिनिधी :
दशावतार कलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांचा सन्मान या उदात्त ध्येयाने कार्यरत असलेल्या दशावतार कलाकार समिती, दोडामार्गचा पाचवा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी झरेबांबर येथील भंडारी समाज सभागृहात मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकारांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, समिती सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण तसेच पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी दोडामार्ग पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहा गवस, झरेबांबरचे सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच शाम नाईक, पोलीस पाटील चंद्रशेखर सावंत, नाईक दशावतार नाट्य मंडळ, झरेबांबरचे मालक लक्ष्मण बाळा नाईक, सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ, पिकुळेचे मालक फटी रतनू गवस, ग्रामस्थ केशव गवस, निळकंठ गवस, निवृत्त शिक्षक संतोष घोगळे, तसेच समितीचे पदाधिकारी, सदस्य, कलाकार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना सौ. स्नेहा गवस यांनी लोककलांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगून, कलाकारांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान असल्याचे प्रतिपादन केले.
सरपंच अनिल शेटकर यांनी दशावतार ही केवळ करमणुकीची कला नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. पुराणातील ज्ञान, संस्कार आणि सामाजिक मूल्ये जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दशावतारातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. गावोगावी होणाऱ्या जत्रा-उत्सवांमध्ये अनावश्यक खर्च टाळून दशावतार नाट्य मंडळांना अधिक मानधन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस पाटील चंद्रशेखर सावंत यांनी कलाकारांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कार्याचे कौतुक होणे आवश्यक असल्याचे सांगत, सर्व कलाकारांना एकत्रित ठेवून लोककलेच्या जतनासाठी समिती करत असलेल्या कार्याचे अभिनंदन केले.
निवृत्त शिक्षक संतोष घोगळे यांनी दुःख विसरून आनंद, संस्कार आणि अध्यात्माकडे नेणारे प्रभावी माध्यम म्हणजे दशावतार कला असल्याचे सांगून या परंपरेचे जतन करण्याचे आवाहन केले.
यावेळी समितीचे सदस्य व दशावतार कलाकार नारायण महादेव गवस, दीपक रामकृष्ण गवस, संभाजी रामचंद्र गवस आणि सुधीर सदानंद गवस (सर्व, झोळंबे) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सेजल सुभाष लोंढे (कोनाळ-लोंढेवाडी), दीपराज देवेंद्र भैरवकर, हर्ष बुधाजी जाधव, हर्षिता बुधाजी जाधव, दिव्या भगवान नाईक, दैवीक दीपक गवस, संचित सुधीर परब, राज नारायण खांबल, श्रीयश सतीश गवस, आराध्य सागर नाईक आणि आर्यन अंकुश जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
तसेच समितीचे सदस्य नारायण मनोहर खांबल, देवेंद्र विष्णू भैरवकर, संभाजी रामचंद्र गवस, मधुसूदन तुकाराम गवस, गंगाराम गणपत देसाई, बुधाजी विठ्ठल जाधव आणि आनंद काशीनाथ वर्णेकर यांना समितीची ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.
सोहळ्याची सांगता समितीच्या कलाकारांनी सादर केलेल्या “दिधले दान सौभाग्याचे” या प्रभावी पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाने झाली. कलाकारांच्या दमदार अभिनयाला व उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शंकर मधुकर जाधव यांनी केले. प्रास्ताविक आभार समितिचे सदस्य तथा सावंतवाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप धोंडू गवस यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा