दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सावंतवाडीत भव्य सत्कार सोहळा
शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित; आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता काझी शहाबुद्धीन हॉलमध्ये
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आणि माननीय आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत हा सोहळा सावंतवाडी शहरातील एस. टी. स्टँडसमोरील ऐतिहासिक काझी शहाबुद्धीन हॉल येथे सायंकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे.
या विशेष सोहळ्यास तालुक्यातील नागरिक, शिक्षक, पालक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
