You are currently viewing वारी चालली चालली

वारी चालली चालली

*अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी, श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

*”वारी चालली चालली*

 

वारी चालते पाऊल

पंढरीच्या वाटेवरी

नेत्री पहाया विठ्ठल

भक्त धावे भीमातिरी

 

नसे भान कुणालाही

किती कापले अंतर

वाट तुडवीत चाले

मनी विठू निरंतर

 

कधी कोसळे पाऊस

कधी उन्हाचे चटके

जातीपाती कितीतरी

ऐकू येती ना खटके

 

मन अथांग विशाल

एक एका भक्ताठायी

भेदभावा नाही थारा

कुणाच्याही चित्ताठायी

 

रूप पाहतो विठूचे

वारकरी माणसांत

रंग गोरा असो काळा

विठू नित्य हृदयांत

 

गोरगरिबांचा देव

ख्याती त्याची सर्वदूर

त्याच्या जोगे पंढरीत

ओघ जणू महापूर

 

सावळ्याच्या दर्शनाने

गात्रे गात्रे सुखावली

विठू नामाच्या गजरे

सारी सृष्टी आनंदली

 

🖊️दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा