You are currently viewing २४ वर्षांची प्रतीक्षा संपली; माजगावच्या जीर्ण नकाशांचा प्रश्न अखेर मार्गी
Oplus_16908288

२४ वर्षांची प्रतीक्षा संपली; माजगावच्या जीर्ण नकाशांचा प्रश्न अखेर मार्गी

श्रीकृष्ण ऊर्फ बाबू सावंत यांच्या नेतृत्वाखालील उपोषणाला यश; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सावंतवाडी / प्रतिनिधी :

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील खातेदार शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे उपलब्ध होत नसल्याने महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनास्थेविरोधात ग्रामस्थांनी आज माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ बाबू सावंत यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही’, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर तहसीलदार श्रीधर पाटील तसेच भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण होऊन फाटल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाकडून ते उपलब्ध करून दिले जात नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची हद्द निश्चित करता येत नव्हती. तसेच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अथवा वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करताना नकाशे उपलब्ध नसल्याने अनेक प्रस्ताव फेटाळले जात होते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते.

सन २००० मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर, म्हणजेच गेली २४ वर्षे माजगाव ग्रामस्थ या प्रश्नासंदर्भात सातत्याने लेखी व तोंडी पाठपुरावा करत होते. सन २००२ मध्ये शासनाच्या ‘समाधान योजनेत’ हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

या प्रशासकीय अनास्थेविरोधात छेडण्यात आलेल्या उपोषणाला राजकीय नेते व ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा लाभला. उपोषणस्थळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजगावच्या सरपंच रंजना कानसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सरपंच संजय कानसे, दिनेश सावंत, अजय सावंत तसेच चराठा गावच्या सरपंच प्राची कुबल यांनी उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

दरम्यान, तहसीलदार श्रीधर पाटील व उपअधीक्षक विनायक ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. माजगाव येथील एकूण ३२० भूमापन क्रमांकांपैकी ११४ क्रमांकांचे नकाशे सुस्थितीत असून उर्वरित जीर्ण नकाशांचे पुनर्गठन करण्यासाठीचा सविस्तर अहवाल १० जुलै २०२६ पर्यंत जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर हा प्रस्ताव मुंबई येथील उपसंचालक, भूमी अभिलेख कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवून, मंजुरीनंतर संबंधितांना नोटीस देत ६० दिवसांत मोजणी पूर्ण करून अद्ययावत नकाशे ग्रामपंचायतीत उपलब्ध करून दिले जातील, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. या ठोस लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा