जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांचा सामाजिक उपक्रम
सावंतवाडी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विक्रांत सावंत यांच्याकडून आज ओटवणे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंत यांच्या वतीने ओटवणे येथील चारही शाळांमधील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या कंपास पेट्यांचे वाटप करण्यात आले. ‘ज्ञान हेच खरे बळ’ हा विचार घेऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य उत्कर्ष गावकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, विश्वनाथ बोरले, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ओटवणे येथील चारही शाळांच्या शिक्षकवृंदांनी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून सामाजिक भान राखत उपयुक्त कंपास पेट्यांचे वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे विशेष आभार मानले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण मतदारसंघात या उपक्रमाचे जाहीर कौतुक होत असून नितेश राणे यांना दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यात येत आहेत.
यावेळी संस्थेचे सचिव साईनाथ नार्वेकर, शिक्षक प्रशांत आडेलकर, यतिन धुरी, ज्ञानेश्वर काणेकर, श्रुती धुरी, सिल्विया वेगास, अंजू डिसोझा यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ खेळवस्तूंचे वाटप न राहता सामाजिक बांधिलकी, शिक्षणप्रेम आणि बालमनांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा एक सुंदर संदेश देणारा ठरला. अशा उपक्रमांमधून समाजात संवेदनशीलता, दातृत्व आणि सकारात्मक विचारांची बीजे रुजत असून, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हीच या वाढदिवसाची खरी आणि सर्वात मौल्यवान भेट ठरली आहे
