पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करुळ येथे अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन
महिलांनी रोजगारनिर्मितीसाठी पुढे यावे; सिद्धेश रावराणे यांचे आवाहन
करुळ / वैभववाडी :
पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करुळ गावठण अ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना सिद्धेश रावराणे म्हणाले की, गावातील शाळांच्या शैक्षणिक प्रगतीकडे प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक आहे. ती प्रत्येक नागरिकाची बांधिलकी आहे. करुळमधील प्राथमिक शाळांचा कायापालट स्थानिक ग्रामस्थांनी लोकसहभागातून केला असून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाकडून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ घेत आहेत. उपलब्ध सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच साची कोलते, चेअरमन दिगंबर पाटील, बाळा कदम, उपसरपंच भास्कर सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब कोलते, प्रकल्प अधिकारी श्रीमती काकडे, श्रीमती सकपाळ, रमेश पांचाळ, प्रकाश सावंत, मंगेश घाडी, रोहिणी लाड, माधवी राऊत, संध्या शिवगण यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सिद्धेश रावराणे यांनी बचत गटांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असल्याचे सांगत महिलांनी रोजगार व व्यवसाय निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. गावातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचा असलेला लोकसहभाग प्रेरणादायी असून त्याचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
दिगंबर पाटील, नरेंद्र कोलते, साची कोलते, बाळा कदम, बाबासाहेब कोलते आणि रोहिणी लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पुरोहित अक्षय कानिटकर यांच्या उपस्थितीत गणेश पूजन करण्यात आले. अंगणवाडी इमारतीचे काम कमी वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल सिद्धेश कोलते, सचिन कोलते आणि सुशांत कोलते यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धेश कोलते यांनी केले.
