You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला स्वच्छ पाण्याचा आधार; सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला स्वच्छ पाण्याचा आधार; सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला स्वच्छ पाण्याचा आधार; सार्वजनिक विहिरीचा गाळ उपसा

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या पुढाकारातून नगरपालिकेकडून काम पूर्ण; रुग्णांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यास मदत

सावंतवाडी, प्रतिनिधी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयालगत असलेल्या सिद्धीवाडा येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक विहिरीतील अनेक वर्षांचा गाळ काढून विहीर स्वच्छ करण्यात आली आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना स्वच्छ व निर्जंतुक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या या सार्वजनिक विहिरीतून पूर्वीही रुग्णालयासाठी पाणीपुरवठा करण्यात येत होता. सात ते आठ वर्षांपूर्वी रुग्णालयात पाण्याचा अपुरा पुरवठा होत असल्याने विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून याबाबत आवाज उठविण्यात आला होता. त्यावेळी राजू मसूरकर यांनी पुढाकार घेत नगरपालिकेच्या विहिरीवर पंप बसवून पाईपलाईनद्वारे रुग्णालयात पाणी पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. यासाठी तत्कालीन आमदार तथा विद्यमान मंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

सदर विहिरीचा गाळ उपसा करण्याचे काम सावंतवाडी नगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले. यासाठी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, आरोग्य अधिकारी विनोद सावंत तसेच दीपक म्हापसेकर यांनी सहकार्य केल्याचे मसूरकर यांनी सांगितले.

अशुद्ध पाण्यामुळे टायफॉईड, कावीळ, डायरिया यांसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सार्वजनिक विहिरींची नियमित स्वच्छता करून दर तीन ते चार वर्षांनी गाळ उपसा करणे आवश्यक असल्याचे मसूरकर यांनी नमूद केले. तसेच विहिरीतील पाणी शुद्ध राहण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत आणि दीपक म्हापसेकर यांचे राजू मसूरकर यांनी रुग्णालय प्रशासन व रुग्णांच्या वतीने आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा