फोंडाघाटमध्ये भूकंपाचे धक्के; दोन घरांचे मोठे नुकसान
मध्यरात्री जोरदार आवाजानंतर भिंतींना तडे, जमीन खचली; सरपंच संजना आग्रे व सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांची घटनास्थळी पाहणी, पंचनाम्याच्या सूचना
फोंडाघाट,
फोंडाघाट परिसरात मध्यरात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे सोमनाथ चव्हाण आणि बाळू चव्हाण यांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास जोरदार आवाज झाला आणि त्यानंतर घरांच्या भिंती हलू लागल्या.
या धक्क्यामुळे घरांच्या भिंतींना मोठे तडे गेले असून घराजवळील जमीनही काही ठिकाणी खचल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच फोंडाघाटच्या सरपंच संजना आग्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
सरपंच आग्रे यांनी तत्काळ तलाठी यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी तहसील प्रशासनालाही घटनेची माहिती देऊन तातडीने मदत व पाहणी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त घरांच्या जवळच लोरे धरण क्षेत्र असल्याने या परिसरातील परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
