मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा !
चिपळूण,मांडकी-पालवण,
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या विशेष दिनानिमित्त प्रमुख योग प्रशिक्षक श्री. प्रीतम चौधरी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी योगाचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान श्री. चौधरी यांनी विविध योगासनांचे प्रकार व वेगवेगळ्या आसनांची सविस्तर माहिती दिली. या आसनांचे शरीरावर आणि आरोग्यावर होणारे सकारात्मक फायदे समजावून सांगत, त्यांनी सर्व आसनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष करून घेतली.
योगासनाचा अभ्यास हा भारताला लाभलेला प्राचीन वारसा आहे. २०१४ सालापासून जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जात आहे.”
या योग दिनाच्या निमित्ताने गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रमुख प्राध्यापक ज्ञानोबा बोकडे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी सामूहिक योगासने करून ‘निरोगी शरीर, सुदृढ मन’ असा संदेश दिला.
