You are currently viewing योग, डाएट करूया सुरू

योग, डाएट करूया सुरू

*श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक, जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य, तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित पुस्तक लेख*

 

*योग, डाएट करूया सुरू…*

*आज नको…उद्यापासून…*

 

योग हा केवळ एक शारीरिक व्यायाम किंवा कला नसून आयुष्य सुबक सफल घडविण्यासाठीची साधना आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचा सुसंवाद किंवा परमात्म्याशी एकरूप होणे म्हणजेच योग. स्वतःच्या मनावर विजय मिळविण्याचा, भावनांवर संयम राखण्याचा आणि लोभ, आसक्ती, मोह यावर नियंत्रण ठेवण्याचा साधा सोपा उपाय म्हणजे योग. महर्षी पतंजली यांनी योगसूत्र या ग्रंथात योगाची व्याख्या सांगताना म्हटले की, “मनातील विचारांच्या लहरींवर किंवा वृत्तींवर नियंत्रण मिळवणे म्हणजे योग”. योग हा जगण्याचा एक मार्ग आहे. तो तुम्हाला केवळ निरोगी शरीरच देत नाही, तर जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी आणि आंतरिक शांतता देतो. प्रत्येक वर्षी “२१ जून” हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. योग दिवसाचे औचित्य साधून अनेक संस्था, मंडळे योग साधना वर्गाचे आयोजन करतात, जणू एक इव्हेंट…सोहळाच..! कितीतरी हौशेगौशे त्यात सामील होतात परंतु, एक दिवस फोटोसेशन, सेल्फी काढून योग दिवस साजरा करतात. पण, एक दिवस केलेला हा सोहळा देईल का चिरकाल स्वास्थ्य..? मिळेल का त्याने मानसिक समाधान…? एका दिवसाच्या श्रमाने आलेला थकवा आपसुकच त्यांच्या मुखातून वदवून घेतो…योग करूया सुरू…आज नको उद्यापासून..!

 

एक वेळ अशी होती की माणसाची गरज ही केवळ अन्न, वस्त्र, निवारा होती…कारण त्यावेळी तंदुरुस्ती हा विषयच नव्हता, दिवसभर शारीरिक कष्ट करून प्रत्येकजण खात पित असायचा त्यामुळे आरोग्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आज अन्न ही गरज राहिली नाही तर आपण काय खातो, कुठे खातो आणि ते कसं दिसतं, याला खूप महत्त्व आलं आहे. फाईव्ह-स्टार हॉटेल्स, कॅफे संस्कृती यामुळे ती दिखावा किंवा स्टेटस बनली आहे. जेवणाचा आस्वाद घेतला जात नाही तर त्याचा फोटो स्टेटस लावणे अधिक महत्त्वाचे ठरते; म्हणजेच ते पोटाची नव्हे मनाची भूक अन् भावनांना नियंत्रित करण्याचे साधन ठरले आहे. जे मिळतं ते आणि मिळेल तेव्हा खात राहणे मग ते अरबट चरबट काहीही असो…! वस्त्र ही फॅशन झाली, ती केवळ अंग झाकण्यासाठीच नव्हे तर झाकलेल्यातून सुद्धा फाडून काहीतरी उघडं करण्या एवढी मोकाट सुटली आहे…आणि निवारा दगड मातीच्या घरात अन् कौलारू छपराच्या खाली आता विसावत नाही तर टोलेजंग इमारतींच्या कुठल्यातरी मजल्यावर किंवा महागड्या बंगल्यात आरामदायी सोफ्यावर पहुडला आहे. नाश्त्यातली भाकरी…पिझ्झा, बर्गर मध्ये जाऊन टम्म फुगली अन् जेवणातील डाळ भात केव्हाच मॅगीच्या नुडल्स मध्ये हळद लावून बोहल्यावर चढून बसली. शेती पडली ओस आणि पोरं करतात बापाच्या जीवावर कुठलातरी कोर्स. आरामदायी झालं जीवन अन् कुठलाच निर्णय होईना ठोस. नोकरी करता करता पुरुषाच्या पोटाचा होतो फुटबॉल आणि घरात असलेली बाई फुगली तरी वाटू लागते डॉल. जीना चढता चढता उर भरून येतो, क्षणात छाती फुलते अन् वेग श्वासांचा वाढतो… तेव्हा कुठे वाटते, “आता खाण्यावर नियंत्रण ठेवायचं त्यासाठी डाएट सुरू करायचं, दोन चार का होईनात योग करायचे, थोडंफार चालायचं, नित्य व्यायाम करायचा सुरू…पण, आज नको, उद्यापासून…!”

 

पाहिलाय का कुणी उद्या कधी आलेला…? हा टळणारा ‘उद्या’ कधीच येत नाही, हेच तर खरं आहे!

आजचा दिवस आळसात बुडाला

अन् मनात विचार उद्याचा आला…

पण.., उद्याचा रवि उदयास येताच

कालचाच “उद्या” पुन्हा “आज” झाला…

 

*”कल करे सो आज, और आज करे सो अब”….*

हिंदी असू दे बाबांनो पण, फळ्यावर लिहिण्यासाठी सुविचार मात्र सुरेख आहे. पूर्वी मातीच्या घराला चारही बाजूंनी लाकडी सरी असायच्या भिंतींवर, भिंतींमध्ये अन् दिवाणखान्यात छानसा शिसम वगैरे लाकडाचा माळा… माळ्याच्या भार आपल्या अंगावर अलगद पेलणाऱ्या ज्या लांब रुंद सरी असायच्या त्यावर सुंदर सुविचार लिहिलेले असायचे. तेव्हा ते पाळले जायचे कारण, लोक आळशी नव्हते..आज सुविचार जगभर मित्रमैत्रिणींना पाठवले जातात, पाळत मात्र कोणीच नाहीत. हळूहळू आळसाचा कहर होतो, आरामाला बहर येतो… अन् वय वाढू लागतं तसा व्याधींना मोहोर फुटतो…नकळत आजारांचा जणू श्राप लागतो..बोलताना दम, चालताना धाप आणि डॉक्टर कडून खाणे, पिणे, झोपणे सगळ्यांवर बसतो चाप.

 

व्याधी, आजार म्हणजे मेंढरांचा कळपच म्हणा ना..! त्या थोड्याच आपल्यासारख्या असतात एकलकोंड्या..! अन् नसतात फक्त एकावरच प्रेम करणाऱ्या; मेंढरांसारख्याच येतात एका मागून एक नि लोटून देतात स्वतःला माणसांच्या शरीरात सर्वस्व झोकून देणाऱ्या ध्येयवेड्यासारख्या..! कधीतरी तीव्र भूक लागते जणू पोटात आगडोंब उसळतो…दरदरून घाम फुटतो अन् अंगात त्राण नसल्यासारखे वाटून चक्कर येऊन पडतो की काय अशी परिस्थिती येते… मग काय..? डॉक्टर नाडी तपासतात, स्टेटस्कोप छाती, पाठीवर लावून हृदयाची धडधड जाणून घेतात… रक्त तपासले जाते अन् मधुमेह असल्याचं निदान होतं…. एकदा का मधुमेह जडला की, त्याचा सावत्र म्हणा किंवा जुळा भाऊ रक्तदाब मागोमाग येतो. तो थोडीच संधी सोडणार आहे. लग्नाचे माटव जेवण असल्यावर चिकन मटणवर फुकटचा ताव मारायला सगळेच जातात त्यातलाच हा एक प्रकार..! रक्तदाब अस्वस्थता पसरवतो… क्षणात चांगला क्षणात घाबरघुबरा करून सोडतो. मग हळूहळू लागण लागते एकेकाची मागोमाग… युरिक ॲसिड, ट्रायग्लिसरिड, क्रिएटनिन, गुढगे दुःखी, नजरदोष असे एक ना अनेक सख्खे, चुलत, मावस, भाऊबंद, नातेवाईक माणसाच्या सुखवस्तू शरीरात घरोबा करू लागतात… तेव्हा मात्र डॉक्टर सल्ला देतात..”आता चालणे फिरणे, हलका व्यायाम करा, निदान घरच्या घरी योगा तरी करा..गोड, मसालेदार, जास्त मीठ असलेलं अन्न कमी खा, पालेभाज्या, मोड आलेलं धान्य जेवणात समावेश करा..सकाळी भरपेट नाश्ता, दुपारी आवश्यक तेवढं जेवण आणि रात्री सातच्या आत हलका आहार घ्या..” मग उत्साहाने भारलेलं आपलं सुडौल शरीर नाईलाजाने तरी म्हणतं… “आता योग, डाएट करूया सुरू…आज नको..उद्यापासून…”

मग काय..! पहाटे पाच वाजताचाच अलार्म लावला जातो…सकाळी अलार्म वाजला की, डोळ्यावरची झोप काही जात नाही, सवयीचा गुण..! थोडाच ठरवलं म्हणून तात्काळ सुटणार…? “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” म्हणतात ते हेच की काय कोण जाणे…पण, अलार्म बंद करायला हात मात्र घड्याळाकडे बरोबर जातो, बोटं पटकन अलार्मचा गळा दाबतात अन् त्यादिवशी फिरायला जाण्याचा बेत आपल्याच कर्माने रद्द होतो आणि जरासं हायसं वाटतं.

मग मनोमन ठरवलं जातं, आज राहू द्या, उद्यापासून जाऊ.

योग, व्यायाम थोडेच आपल्याला या वयात जमणार आहेत… श्वास घेणे सोडणे ठीक आहे.. म्हणजे ते अनुलोम, विलोम सारखे प्राणायाम वगैरे चालेल बसल्या जागी करायला. पण, योगा नको रे बाबा, कुठेतरी हाड बिड मोडलं तर जुळता जुळणार नाही अशी अनेक कारणे आपल्याकडे तयारच असतात. पण, खरंतर योगा करणे हे केवळ शारीरिक व्यायामापुरते मर्यादित नसून, ते शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारे एक शास्त्र आहे. योग ही केवळ एक कला नसून आधुनिक काळात आपले जीवन निरोगी ठेवण्यासाठीची एक साधना आहे. आधुनिक जीवनशैलीत तणावमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. केवळ कपालभाती प्राणायाम करून हृदय तारुण्यात घेऊन जातात ते योग..प्राणायामामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला, विशेषतः हृदयाच्या स्नायूंना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो जणू ऑक्सिजचा महापूर येतो, ज्यामुळे पेशींचे पुनरुज्जीवन होते. भ्रमरा समान श्वासांनी केलेलं गुंजन हृदयाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त करून देतं… *भुजंगासन* सारख्या पोटावर झोपून केलेल्या योगाने पाठ आणि मणक्याचे आजार दूर पळून जातात आणि तर *पश्चिमोत्तानासन* केवळ बसल्या जागेवर पोटाचे स्नायू बळकट करून खाल्लेलं अन्न पचविण्याची शक्ती प्रदान करते… *वज्रासन* जेवून खाऊन गुढघ्यात पाय दुमडून आरामात बसलो तरी पायाचे स्नायू बळकट करून बद्धकोष्ठता दूर करतं…आणि एकदा का आपण खाल्लेलं पचले की, नसानसातून आनंदाच्या लहरी वाहू लागतात, मनामनात ताजेतवानेपणा जागृत होतो आणि मन प्रसन्न होते. *ताडासन* उभ्या उभ्या पाठीचा कणा मजबूत करून मुलांची उंची वाढवते आणि *शवासन* पाठीवर आरामशीर झोपवून शरीर नि मनाला विश्रांती देते, उच्च रक्तदाब नियंत्रित करून मानसिक थकवा घालवते आणि पुन्हा एकदा स्वप्नांच्या दुनियेची सैर करून आणतं.

वेगवेगळ्या आसनांमुळे स्नायू बळकट होतातच पण शरीराची लवचिकता वाढते. जरासं वाकलो तरी “आई ग” म्हणून कंबरेवर हात जातात ना, तेव्हा मात्र वाटतं, योगा सुरू केले असते तर झटपट वाकता आलं असतं. आपल्या समोर कोणीतरी सहज उडी मारत जातो तेव्हा त्याच्यातील उत्साह पाहून आपणही योग, व्यायाम करून तंदुरुस्त रहावं अशी मनोमन इच्छा होते पण…आज नको उद्यापासून, हा “उद्याच” आपला सर्वात मोठा शत्रू बनतो. मग कधीतरी म्हणतो, योग व्यायाम यापेक्षा डाएट सुरू करू आणि सकाळी चालायला जाऊ, आपोआप अन्नच कमी खाल्ल की, वजन कमी होईल. पण, कुठलं मेलं वजन कमी व्हायचं..? घरी डाळ भात बंद करायचा आणि शेजवान चायनीज राईस खायचा… भाकरीचा कंटाळा मग एखादा पिझ्झाचा तुकडा चालतोच की..! एका त्रिकोणाने काय पोट गोलाकार होणार..? आपल्याच प्रश्नांची आपणच उत्तरं शोधायची अन् मस्त ताव मारत डाएट करायचा.

लहानपणी कुठे होत्या गाड्या..? वजनदार पिशवी घेऊन बाजार सुद्धा चालतच आणायचो ना..! तेव्हा कुठे होते रोग आणि पायाची दुखणी..? कारण, आपल्या पायांना तेव्हा चालण्याची सवय होती..आज आळसाची चाके लागलीत. आपले पाय चालतात सुद्धा हे पण काहीजणांना माहिती नसते एवढी वाईट अवस्था माणसांची झालेली असते.

*पादचारेण गमनं शरीराणां परं हितम्।

*आरोग्यं लभते नित्यं मन्दं मन्दं च यश्चरेत्॥

 

पायांनी चालणे हे शरीरासाठी अत्यंत हितकारक आहे. जो मनुष्य रोज हळूहळू आणि नियमितपणे चालण्याची सवय ठेवतो, त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. हे सर्व आपण जाणतो पण, चालायचे कोणी…? आजचे काम उद्यावर ढकलतो…तिथेच आपल्या आरोग्याचा घात करून घेतो. चुकीची जीवनशैली आपलीशी करून आयुष्याची दिशा बदलतो. आज आपण स्वतःहून चालायचे विसरतो आणि विविध संस्थांनी चालायचा जाण्याचे वेगवेगळे कार्यक्रम आखले की एक दिवस जणू सोहळा असल्यासारखे नवीन ट्रॅक सूट घेऊन इव्हेंट साजरा करतो. कित्ती तो आनंद असतो मग चेहऱ्यावर..! का..? तर आपण मोठमोठे नेते, नट नट्यांसोबत चालायला गेलो याचं कौतुक अन् बिनकामाचा मोठेपणा..!

खरंतर, चालण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. नियमितपणे चालणे हा आरोग्यासाठी सर्वात सोपा, सुरक्षित आणि तितकाच प्रभावी व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही महागड्या साहित्याची किंवा जिमच्या मेंबरशिपची गरज नसते बरं का…! नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. आळसावलेल्या शरीराला ढेकर देण्याची एवढी सवय लागलेली असते की, ते कधीही कुठेही वाघासारखी डरकाळी फोडते. चालण्याने पचनक्रिया सुधारते गॅस, अपचन आणि बद्धकोष्टतेसारख्या समस्या दूर होतात अन् डरकाळ्या बंद होतात. पायाचे, पाठीचे, पोटाचे स्नायू बळकट होतात. वजन नियंत्रित राहते, साखरेची पातळी घटते, ताण तणाव कमी होतात, ताजेतवाने वाटते जणू एकप्रकारची ऊर्जा येते अंगात आणि कुठलेही कूल कूल ठंडा ठंडा तेल न घालता सुद्धा शांत झोप लागते.. मी सुद्धा दहा पंधरा किलोमीटर सहज चालू शकतो तो केवळ रोज अर्ध्या तासात पाच सहा किलोमीटर सलग चालण्याच्या सवयीमुळे…! पण रमत गमत, गप्पागोष्टी करत चालणे हा व्यायाम नव्हे, त्यासाठी एका चालीत चालले पाहिजे हे मात्र खरे..!

चालणे या व्यायामासोबत रोज हलका शारीरिक व्यायाम सुद्धा शरीरासाठी अत्यावश्यक असतो. हाडांची, सांध्यांची मजबुती यासाठी हात पाय, कंबर, पोट यासाठीचे छोटे छोटे व्यायाम अगदी पंधरा मिनिटे केले तरी शारीरिक तंदुरुस्ती राखली जाते… हे स्वानुभवानुसार मी सांगू शकतो.. केवळ त्यासाठी आवश्यक आहे ते… “उद्यापासून” ही मानसिकता बदलणे अन् “आज, आत्तापासून” योग, व्यायाम, डाएट सुरू करणे.

कारण..,

फक्त योग दिवस साजरा करून तंदुरुस्तीची प्राप्ती होणार नाही तर, योग करण्याची मानसिकता अंतरी तयार व्हावी लागते अन् ती कृतीत उतरावी लागते.

चला तर करूया तयारी…..

अगदी मनापासून आजपासून योगाची….

 

✒️दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा