*घारपी प्राथमिक शाळेत १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा*
बांदा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.चालूवर्षीच्या “निरोगी वार्धक्यासाठी योग ” या संकल्पनेनुसार आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील नियमित योग करणारे ग्रामस्थ सहदेव गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर योगवर्गास प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, मकरासन आदी योगासनांचा सराव करत विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व अनुभवले.
योग हा केवळ व्यायाम नसून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ ठेवणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. योगामुळे तणाव कमी होऊन निरोगी व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, यावरही प्रकाश टाकण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर व संचिता सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून “योग करा, निरोगी रहा” हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
“योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी योगाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
