वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने सरकारच्या अघोषीत आणिबाणी विरोधात आंदोलन

वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने सरकारच्या अघोषीत आणिबाणी विरोधात आंदोलन

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या समोर केंद्र सरकारच्या अघोषीत आणिबाणीच्या विरोधात आणि भाजपच्या करंटेपणामुळे ओबीसी समाजाचे जे आरक्षण रद्द झाले त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी देशात अघोषीत आणिबाणी लागू करणा-या मोदी सरकारचा निषेध असो, केंद्र सरकारचा निषेध असो, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी,  इत्यादी घोषणानी परिसर दणाणून सोडला. यावेळी काळे झेंडे दाखवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख म्हणाले की आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांची 147वी जयंती आहे. छत्रपती शाहू महाराज हे लोक कल्याणकारी राजा होते. परंतू आज केंद्रतील मोदी सरकारने देशात अघोषीत आणिबाणी लादलेली आहे. जोकोणी केंद्र सरकारच्या व पंतप्रधान मोदीच्या चुकीच्या धोरणा विरोधात बोलेल त्याला देशद्रोही ठरवून तुरूंगात डांबले जात आहे. राज्यघटनेने देशातील नागरिकांना बोलण्याचा आपले मत मांडण्याचा जो अधिकार दिला आहे त्यावर गदा आणण्याचे काम हे हुकुमशाही मोदी सरकार करत आहे. या हुकुमशाही सरकारला उलथून टाकल्याशिवाय बहुजन समाजाला या देशात नाय मिळणार नाही. ओबीसी समाजाचे जे आरक्षण रद्द झाले आहे याला फक्त आणि फक्त भाजप जबाबदार आहे. मागिल फडणवीस सरकारच्या काळात फडणवीस सरकारने कोर्टाला ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देण्याची विनंती केली. परंतू लोकसंख्या निहाय माहिती मोदींच्या भाजपच्या केंद्र सरकारने कोर्टाला दिलीच नाही.

मनमोहनसिंग सरकारच्या काळात सामाजिक आर्थिक व जातीनिहाय जनगणना 2011 या शीर्षकाखाली माहिती गोळा करण्याची सुरुवात महात्मा गांधी जयंती दिनी म्हणजे 2 ऑक्टोबर 2011 पासून करण्यात आली होती. परंतू ही गोळा झालेली माहिती 2014 साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत सुप्रीम कोर्टाने मागणी करूनही ही माहिती सुप्रीम कोर्टाला दिली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण हे भाजपचे पाप आहे. भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षण विरोधी आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावर नाचणा-या भाजपला आरक्षण मान्य नसणार म्हणुनच भाजप आरक्षणा विरोधात छुपा अजेंडा चालवत आहे. आज जिल्ह्यामध्ये भाजप ओबीसी आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे त्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रतील मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करावे असा सल्ला यावेळी इर्शाद शेख यांनी दिला.

यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, तालुका सरचिटणीस उत्तम चव्हाण,शहर अध्यक्ष नगरसेवक व गटनेते प्रकाश डिचोलकर,नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे,नगरसेविका व महिला शहर अध्यक्षा कृतिका कुबल, एन.एस. यु.आय.तालुका अध्यक्ष शुभम गावडे अंकुश मलबारी,समीर नागवेकर,जुबेर जंग्गुभाई,शरीफ शेख,अक्षय डोंगरे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा