सभापती सिद्धेश रावराणे यांचा अधिकाऱ्यांना खडसावला सवाल
शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याचा आरोप; भुईबावडा कॉपी प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
वैभववाडी : पंचायत समितीच्या मासिक सभेत सामाजिक वनीकरण विभागाच्या कामकाजासह भुईबावडा परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणाचा मुद्दा गाजला. यावेळी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी दोन्ही विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच भुईबावडा कॉपी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
येथील वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात सुरू असलेल्या मासिक सभेत सामाजिक वनीकरण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याची माहिती सादर केली. सन २०२४-२५ मधील मेळाव्यास केवळ चार, तर सन २०२५-२६ मधील मेळाव्यास ११ शेतकरी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती ऐकताच सभापती रावराणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कोणतीही योजना राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात नेमकी कोणती कामे केली आहेत, याची माहिती द्यावी. कुर्ली परिसरात कुठे वृक्षारोपण केले आहे, तेही दाखवून द्यावे. केवळ अहवालांमध्ये कामे दाखवून चालणार नाही, तर ती प्रत्यक्षात दिसली पाहिजेत,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यापुढे कोणतीही योजना राबविताना लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना द्यावी, अन्यथा अशा योजना राबवू नयेत, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान, सभेत भुईबावडा परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सभापती रावराणे यांनी गटशिक्षणाधिकारी श्री. थोरात यांच्याकडे या प्रकरणातील कारवाईबाबत माहिती मागितली. त्यावर माध्यमिक शिक्षण विभागामार्फत चौकशी करून अहवाल शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मात्र, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या प्रकरणात २४ जणांना दोषी ठरविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित सर्वांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी रावराणे यांनी केली. तसेच संबंधित शिक्षकांवर त्यांच्या संस्थेकडून कोणती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, याची माहिती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भुईबावडा कॉपी प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्याची बदनामी झाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करतानाच सामाजिक वनीकरण विभागानेही केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी नव्हे तर प्रत्यक्ष परिणाम दिसतील अशा पद्धतीने काम करावे, असे स्पष्ट शब्दांत सभापती सिद्धेश रावराणे यांनी सांगितले.
