सिंधुदुर्गच्या दोन सुपुत्रांची राज्यस्तरीय बुद्धीबळ पंच परीक्षेत घवघवीत यश
बाळकृष्ण पेडणेकर आणि मयुरेश मालवणकर यांची राज्यस्तरीय बुद्धीबळ पंच म्हणून निवड
सावंतवाडी
महाराष्ट्र बुद्धीबळ असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ पंच (आर्बिटर) लेखी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन युवा बुद्धीबळपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सावंतवाडी येथील बाळकृष्ण पेडणेकर आणि मालवण येथील मयुरेश मालवणकर यांनी ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत राज्यस्तरीय बुद्धीबळ पंच म्हणून मान्यता मिळवली आहे.
या परीक्षेपूर्वी रत्नागिरी जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनतर्फे दोन दिवसांच्या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्यभरातील ४५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेत बुद्धीबळातील नियम, तांत्रिक बाबी आणि पंच म्हणून आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर आणि मयुरेश मालवणकर यांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदवून बुद्धीबळातील विविध तांत्रिक पैलू आत्मसात केले. त्यानंतर त्यांनी राज्यस्तरीय पंच परीक्षा दिली आणि उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल मुक्ताई ॲकेडमीच्या सचिव सौ. स्नेहा पेडणेकर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाळकृष्ण पेडणेकर आणि मयुरेश मालवणकर यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा आणि बुद्धीबळ क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
