You are currently viewing एनएबी नेत्र रुग्णालयात अत्याधुनिक रेटिना विभागाचे उद्घाटन

एनएबी नेत्र रुग्णालयात अत्याधुनिक रेटिना विभागाचे उद्घाटन

एनएबी नेत्र रुग्णालयात अत्याधुनिक रेटिना विभागाचे उद्घाटन

डॉ. संदीप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन; १०० टक्के अंध आंतरराष्ट्रीय क्रीडापटू नेहा पावसकर यांचा सत्कार

सावंतवाडी

भटवाडी येथील एनएबी नेत्र रुग्णालयात अत्याधुनिक रेटिना (नेत्रपटल) विभागाचे उद्घाटन आज उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या विभागामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्ररुग्णांना अधिक दर्जेदार व अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी एनएबी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगावकर, कणकवलीचे डॉ. विद्याधर तायशेट्ये, एनएबी सांगलीचे अध्यक्ष बन्सीलाल ओसवाल, उपाध्यक्ष मनीष पटवर्धन, डॉ. पूजा जाधव, विनया बाड तसेच सोमनाथ जिगजीनी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. मल्लिकार्जुन खोत यांनी डोळ्यांचे आरोग्य, त्यांची निगा तसेच एनएबी नेत्र रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची सविस्तर माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतक्या परिपूर्ण सुविधांनी सुसज्ज असे हे पहिलेच नेत्ररुग्णालय असून, रुग्णांना कमी खर्चात दर्जेदार उपचार दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मनीष पटवर्धन व बन्सीलाल ओसवाल यांनी रुग्णालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनंत उचगावकर यांनी आपल्या भाषणात हा दिवस एनएबी सिंधुदुर्ग व एनएबी नेत्र रुग्णालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असल्याचे सांगितले. गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प खर्चात उपचार मिळत असल्याने या रुग्णालयाचे कार्य समाजासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी रुग्णालयाच्या प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विनया बाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सोमनाथ जिगजीनी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला नंदकुमार प्रभुदेसाई, दिलीप म्हापसेकर, सुहास सातोसकर, प्रवीण परब, रामदास पारकर, नकुल पार्सेकर, आबासाहेब कशाळीकर, प्रा. सुभाष गोवेकर, अजित महाडिक, मानसी वेंगुर्लेकर, मौरी भगत, डॉ. महेश जोशी, जयंत नेने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नेत्रतपासणीसाठी मोठ्या संख्येने रुग्णांनीही उपस्थिती लावली.
दरम्यान, राष्ट्रपती पदक तसेच दोन वेळा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू आणि गोलबॉल प्रशिक्षक नेहा पावसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. १०० टक्के अंधत्वावर मात करून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेहा पावसकर यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. एनएबी सांगलीच्या वतीने त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा