पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांतील १५६ विकासकामांना मंजुरी
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रहास्तव जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी-वस्त्यांसाठी सुमारे ७ कोटी ९९ लाख २० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, मंजूर १५६ कामांसाठी एकूण ३९ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमधील पायाभूत सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना देणारी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.
मंजूर निधीतून वस्त्यांमध्ये रस्ते, प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक सुविधा तसेच अन्य मूलभूत विकासकामे करण्यात येणार असून त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. विशेषतः अनेक वस्त्यांमध्ये प्रकाश व्यवस्था उभारली जाणार असल्याने या वस्त्या अधिक सुरक्षित व प्रकाशमान होण्यास मदत होणार आहे.
शासन निर्णयानुसार मंजूर कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच शासनाच्या इतर संबंधित यंत्रणांमार्फत करण्यात येणार आहे. कामांचे अंदाजपत्रक, आराखडे आणि तांत्रिक मान्यता प्राप्त केल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तसेच मंजूर निधीच्या मर्यादेतच कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. या निधीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांची उभारणी होऊन नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
