You are currently viewing आज आकाशात एक काळा ढग दिसला

आज आकाशात एक काळा ढग दिसला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आज आकाशात एक काळा ढग दिसला*

 

आज सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत उभी राहून मी आकाशाकडे पाहत होती… उन्हाळ्याच्या दीर्घ आणि रखरखीत दिवसांनंतर आकाश निरभ्र दिसणे ही काही नवीन गोष्ट नव्हती. निळ्याशार नभाच्या विस्तीर्ण पटांगणात सूर्य आपले तेजस्वी साम्राज्य गाजवत होता. वातावरणात उष्णतेची एक अदृश्य चादर पसरली होती आणि सृष्टीतील प्रत्येक जीव त्या उकाड्याने व्याकूळ झालेला जाणवत होता अशा वेळी माझी नजर आकाशाच्या एका कोपऱ्यात स्थिरावली…तेथे एक काळा ढग दिसला.

तो ढग आकाराने फार मोठा नव्हता परंतु त्याचे अस्तित्व मात्र संपूर्ण आकाशात वेगळेपणाने जाणवत होते… निळ्या आकाशाच्या विशाल पार्श्वभूमीवर तो एखाद्या चित्रकाराने गडद रंगाचा उठावदार फटका मारावा तसा भासत होता. त्याच्या कडा सूर्यकिरणांनी हलक्या सोनेरी रंगाने उजळल्या होत्या तर मध्यभाग काळसर आणि गंभीर दिसत होता. त्या ढगात एक अनामिक आकर्षण होते. त्याच्याकडे पाहत राहावे आणि त्याच्या मौनात दडलेले रहस्य जाणून घ्यावे अशी भावना मनात निर्माण होत होती.

वाऱ्याची एक मंद झुळूक आली आणि तो ढग हळूहळू सरकू लागला. त्याच्या संथ हालचालींमध्ये एक विलक्षण डौल होता. तो घाईत नव्हता अस्वस्थ ही नव्हता उलट एखाद्या विचारवंताप्रमाणे शांतपणे आपला मार्गक्रमण करीत होता. त्याला पाहताना असे वाटत होते की तो दूरवरच्या समुद्रातून अथवा पर्वतरांगांतून असंख्य कथा आणि आठवणी घेऊन आला आहे. त्याच्या सावलीने क्षितिजाचा एक भाग झाकोळला आणि त्या क्षणी वातावरणात एक प्रसन्न गंभीरता पसरली.

त्या काळ्या ढगाने माझ्या मनात अनेक स्मृती जागृत केल्या. बालपणीच्या पावसाळी दिवसांची आठवण झाली. शाळेतून घरी येताना पावसात भिजणे, कागदी होड्या पाण्यात सोडणे, अंगणात साचलेल्या पाण्यात उड्या मारणे आणि गरमागरम चहाचा कप या साऱ्या आठवणी मनाच्या कोपऱ्यातून बाहेर आल्या. एका छोट्याशा ढगाने काळाच्या पडद्याआड गेलेले अनेक क्षण पुन्हा जिवंत केले होते.

निसर्गातील प्रत्येक गोष्ट काही ना काही संदेश देत असते. त्या काळ्या ढगाकडे पाहताना मला आशेचा अर्थ नव्याने उमगला. कितीही कडक ऊन असो, कितीही प्रदीर्घ दुष्काळ असो, आकाशात एखादा काळा ढग दिसला की मनाला दिलासा मिळतो कारण तो परिवर्तनाचा दूत असतो. तो सांगत असतो की स्थिरता हा निसर्गाचा नियम नाही.. बदल हेच जीवनाचे खरे स्वरूप आहे. कोरड्या धरतीला जशी पावसाची आस असते तशीच संघर्षमय जीवनाला नव्या शक्यतांची आस असते.

काळा ढग हा केवळ पावसाचा सूचक नसतो तो संवेदनांचा, आशेचा आणि नवचैतन्याचा प्रतीक असतो. त्याच्या गडद रंगातही जीवनदायी जल साठलेले असते. बाह्यरूपाने गंभीर दिसणाऱ्या त्या ढगाच्या अंतरंगात सृष्टीला तृप्त करण्याची क्षमता दडलेली असते. माणसाचे जीवनही असेच असते. अनेकदा कठीण प्रसंग, दुःख किंवा संकटे काळ्या ढगांसारखी वाटतात परंतु त्यांच्याच गर्भातून नव्या अनुभवांचा, नव्या शक्तीचा आणि नव्या सुरुवातीचा वर्षाव होत असतो.

आज आकाशात दिसलेल्या त्या एकमेव काळ्या ढगाने मला निसर्गाचे एक सुंदर तत्त्व शिकवले. आशा कधीच संपत नाही. विशाल आकाशात एखादा छोटासा काळा ढग जसा पावसाची चाहूल देतो तसाच जीवनातला एखादा छोटासा सकारात्मक संकेत भविष्यातील आनंदाची नांदी ठरू शकतो म्हणूनच त्या काळ्या ढगाकडे पाहताना माझ्या मनात एक प्रसन्न विश्वास जागा झाला

उद्या कदाचित पाऊस येईल धरती तृप्त होईल आणि जीवन पुन्हा नव्या रंगांनी फुलेल…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा