You are currently viewing २०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट- वैभव नाईक

२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट- वैभव नाईक

*२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट- वैभव नाईक*

*आमच्या सत्ताकाळात मायनींगचा एकही प्रकल्प आम्ही सुरु करू दिला नाही*

*आजगाव-धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी केला निषेध*

सिंधुदुर्ग

२०१४ ते २०२४ या काळात मी आणि मा.खा.विनायक राऊत तसेच आमच्या शिवसेना पक्षाचे पालकमंत्री सत्तेत असताना सिंधुदुर्गात आम्ही मायनींगचा एकही प्रकल्प सुरु करू दिला नव्हता. परंतु, आता २०२४ साली एकाच घरात सिंधुदुर्गची सत्ता गेल्याने गेले वर्षभर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरु झाले आहे. तसेच मायनींगचे जवळपास ११ प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित केले गेले आहेत. अशी टीका माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच आजगाव- धाकोरा येथील ५० ग्रामस्थांवर अपहरणाचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी निषेध केला असून सत्ताधाऱ्यांच्या दबावाशिवाय हे होऊ शकत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

वैभव नाईक म्हणाले, आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाचे सर्वेक्षण रोखले म्हणून ५० ग्रामस्थांवर शासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध करतो. आजगाव दशक्रोशी मध्ये मायनिंग प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आलेले कंपनीचे लोक जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र दाखवत होते. खरंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मायनिंग सर्व्हेचा दुरान्वये संबंध येत नाही.मात्र यावरून जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील सत्ताधारी हे अवैध मायनींग प्रकल्पाला पाठींबा देत आहेत हे उघड होते. सर्वेक्षण रोखल्यानंतर मोठ्या प्रमाणात आलेला पोलीस फौजफाटा आणि ग्रामस्थांवर दाखल झालेले अपहरणाचे गुन्हे हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाशिवाय होऊ शकत नाहीत.

२००४ ते २०१४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मायनींगचे सर्व्हे झाले. त्यातून कळणे आणि सातार्डा सारखे मायनींग प्रकल्प सुरु देखील झाले. त्यावेळी जे सत्तेत होते तेच लोक आज पुन्हा सत्तेत आले आहेत. २०१४ ते २०२४ या मधल्या काळात मी आणि विनायक राऊत तसेच आमच्या शिवसेना पक्षाचे पालकमंत्री सत्तेत असताना आम्ही मायनींगचा एकही नवीन प्रकल्प सिंधुदुर्गात सुरु करू दिला नव्हता. परंतु आता २०२४ साली एकाच घरात सिंधुदुर्गची सत्ता गेल्याने गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरु झाले आहे. तसेच मायनींगचे जवळपास ११ प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित केले गेले आहेत. त्याचबरोबर देवगड मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांना कोणाचा आशीर्वाद आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.
मायनींग प्रकल्पामुळे काय होऊ शकते हे कळणे येथील लोकांनी अनुभवले आहे. कळणे येथील जमिनीत उत्खनन झाल्यामुळे चार वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली तेव्हा डोंगर खचून तेथील घरे मातीने भरून गेली होती. शेती, बागायतींचे ,घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियांनी आपल्या जमिनी आणि पर्यावरण वाचविण्यासाठी अशा अवैध मायनींग प्रकल्पांना ठामपणे विरोध केला पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोतच परंतु, सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी देखील त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा