पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तळे सुशोभीकरणाचे लोकार्पण; पर्यटन व नागरी सुविधांवर भर
सिंधुदुर्गनगरी :
कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले, तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘नमो गार्डन’ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून रस्ते, सार्वजनिक सुविधा, उद्याने, पर्यटनवृद्धीस चालना देणारे प्रकल्प आणि सौंदर्यीकरणाची कामे राबवून परिसराचा विकास अधिक गतिमान केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, नमो गार्डनमुळे नागरिकांना विरंगुळ्याचे, आरोग्यदायी वातावरणाचे आणि सामाजिक उपक्रमांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. तसेच तळे सुशोभीकरणासारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनालाही चालना मिळेल.
दोडामार्ग परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने मोठे महत्त्व असल्याचे सांगत पालकमंत्री श्री.राणे यांनी या क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यावर भर दिला. पर्यटक शहरात अधिक काळ थांबतील, अशा सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. यासाठी सिंधुरत्न योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देत पर्यटकांना आकर्षित करणारा विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासन आणि नगरपंचायतीला दिल्या.
याच कार्यक्रमात ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ अंतर्गत नगरपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या ‘नमो गार्डन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. हे उद्यान शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल तसेच नागरिकांसाठी आधुनिक आणि आकर्षक सार्वजनिक जागा निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्री श्री राणे यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, नगरपंचायत अत्यंत उत्साहाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळत आहे. विकासकामांमुळे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक संतोष नानचे, नितीन माणेरीकर, सभापती पार्वती गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती संजना म्हावळणकर यांच्यासह कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
