सरपंच महेश गुरव यांच्या पुढाकारातून आशियेत उद्या भव्य मोफत आरोग्य शिबिर
तज्ञ डॉक्टरांकडून विविध तपासण्या; आयुष्मान कार्ड, एचपीव्ही लसीकरण व डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणीची सुविधा
कणकवली
आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे होणाऱ्या या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश Gurav यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल तसेच डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी एचपीव्ही लसीकरणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हृदयरोग व एचपीव्ही लसीकरणाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून डोळ्यांची तपासणी करून चष्म्यांसाठी नोंदणी केली जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीमार्फत पुढाकार घेण्यात येणार आहे. कमी वजनाच्या बालकांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.
दरम्यान, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर तपासणीसाठी नागरिकांनी उपाशीपोटी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.
