सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मोफत आरोग्य तपासणी, रक्त चाचणीसह आरोग्यविषयक मार्गदर्शन; अनेक नागरिकांनी घेतला लाभ
सावंतवाडी
सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने सर्वोदयनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने गुरुवारी वाव किड्स स्कूल, सर्वोदयनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिरासाठी ‘आपला दवाखाना’च्या डॉ. हर्ष सांगावकर, तृप्ती अंधारी, गायत्री वारंग आणि गंगा सुतार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे रोप देऊन सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हर्ष सांगावकर यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत, “आरोग्य हीच खरी संपत्ती असून ती जपणे हे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य आहे,” असे सांगितले. त्यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देत निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये नागरिकांची जनरल हेल्थ चेकअप तसेच रक्त तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वोदयनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव मेघना राऊळ, खजिनदार विद्याधर तावडे, महिला अध्यक्षा दिशा कामत, शरयू बारदेस्कर, गुंडू साटेलकर, अपेक्षा साटेलकर, योगेश कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी-दुखंडे, रुद्राक्ष भोसले आणि शितल पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच डॉ. विजयालक्ष्मी चिंडक यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. वाव किड्स स्कूलचे संचालक रुजूल पाटणकर यांनी शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्यात येतात. या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी संघाचे कौतुक करत अभिनंदन केले.
