पर्यावरण अभ्यासक स्टॅलिन दयानंद यांचे मार्गदर्शन
समुद्र संवर्धन, किनारी पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासावर होणार चर्चा; आठ स्कुबा डायव्हर्सचा विशेष गौरव, NFDP नोंदणी सुविधाही उपलब्ध
मालवण :
समुद्र संवर्धन, किनारी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समुद्ररक्षक संमेलन २०२६’चे आयोजन शनिवार, १३ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे करण्यात आले आहे.
या संमेलनाचे अध्यक्षस्थान ॲड. देवदत्त परुळेकर, अध्यक्ष, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण भूषविणार आहेत. सुप्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्टॅलिन दयानंद हे गेली अनेक वर्षे पर्यावरण संरक्षण, किनारी परिसंस्था, खारफुटी, पाणथळ प्रदेश, नद्या आणि जैवविविधता संवर्धनासाठी कार्यरत आहेत. वनशक्ती संस्थेमार्फत त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पर्यावरणीय विषयांवर जनजागृती, संशोधन आणि कायदेशीर लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मुंबई परिसरातील खारफुटी व पाणथळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी त्यांनी विशेष कार्य केले असून कोकणातील पर्यावरणीय प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे.
‘विनाश की विकास? : प्रश्न कोकणाचा’ या विषयावर ते कोकणातील विकास प्रकल्प, पर्यावरणीय परिणाम, किनारी परिसंस्था, स्थानिक उपजीविका आणि शाश्वत विकास याबाबत आपले विचार मांडणार आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.
मालवण, तारकर्ली, देवबाग, आचरा, तोंडवळी व संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात समुद्र, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनावर अवलंबून आहे. वाढते समुद्र प्रदूषण, प्लास्टिक कचरा, किनारी पर्यावरणावरील दबाव, सागरी जैवविविधतेचे संवर्धन आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या संमेलनात चर्चा होणार असून समुद्र संवर्धनासाठी सामूहिक कृती आराखड्यावर विचारमंथन करण्यात येणार आहे.
गेली दोन वर्षे वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराने मालवण परिसरात समुद्रतळ स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे समुद्रातील प्लास्टिक व इतर कचरा काढून सागरी पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आठ स्कुबा डायव्हर्सचा या संमेलनात विशेष गौरव करण्यात येणार आहे.
या संमेलनादरम्यान National Fisheries Digital Platform (NFDP) वर नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मच्छीमार, गरकडी, पागली, मासे विक्रेते, खुबे अथवा कालवे काढणारे, मत्स्यशेती करणारे तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
या पोर्टलवर नोंदणी केल्याने मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजना, अनुदाने, प्रशिक्षण, डिजिटल सेवा, माहिती सुविधा आणि इतर लाभ योजनांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मत्स्य व्यवसाय संबंधित विमा योजनेसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे.
National Fisheries Digital Platform (NFDP) तसेच मत्स्य व्यवसाय संबंधित विमा योजनेच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी आधारकार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
समुद्र संवर्धन ही केवळ पर्यावरणाची गरज नसून मालवणच्या अर्थव्यवस्थेचे, पर्यटनाचे, मत्स्य व्यवसायाचे आणि भावी पिढ्यांच्या भवितव्याचे संरक्षण आहे. त्यामुळे या संमेलनास मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व घटक, सिंधुदुर्ग किल्ला व इतर पर्यटनस्थळांसाठी प्रवासी वाहतूक करणारे बोट चालक, मच्छीमार संघटना, रापण संघ, पर्यटन संघटना, हॉटेल व पर्यटन व्यावसायिक, स्कुबा डायव्हिंग व वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू-भगिनी, समाज माध्यम प्रभावक, मालवण नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व जागरूक मालवणवासीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्व आयोजकांच्या वतीने केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२९६७९६४ / ९७६९६७९५३२ संपर्क साधावा.
