वृक्षलागवड आणि संवर्धनाची काळाची गरज; सभापती सिद्धेश रावराणे यांचे प्रतिपादन
वैभववाडी :
लोरे नं. २ ग्रामपंचायतीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणेही आवश्यक असल्याचे मत सभापती सिद्धेश रावराणे यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सिद्धी रितेश सुतार, प्रशासक विलास नांवळे, माजी सरपंच महेंद्र रावराणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल नराम, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेंद्र रावराणे, ग्रामसेवक श्री. कस्तुरे, पोलीस पाटील लवू रावराणे, कृषी सेवक श्रीमती भुजंग आदी उपस्थित होते.
सभापती सिद्धेश रावराणे यांनी वातावरणातील बदल आणि वाढते तापमान लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे योग्य संवर्धन करावे, असे आवाहन केले. तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटील लवू रावराणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कृषीदूतांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथही देण्यात आली. तसेच जिल्हा परिषद सदस्या सिद्धी सुतार आणि प्रशासक विलास नांवळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
