*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पट्टा …माझ्या गळ्यातला..!*
खरं तर …मी नाही
तूच मला फिरवायचा
अजून अजून ..करत करत
तूच मला घुमवत दमवायचा ..
गळ्यांतील पट्याकडे मी बघताचं
बाहेर फिरायला चल! तू खुणवायचा
आजूबाजूच्या गल्या-रस्ते तूच
ओळखीचे करून दिलेस
सकाळ-संध्याकाळ रात्रीच फिरणं
तूच अंगी माझ्या भिनवलसं …….
तू व तुझा पट्टा.. हीच
तुझ्यामुळे ..माझी ओळख होती
अनोळखी लहान -मोठी माणसं
तुझ्या प्रेमांत पडली होती ……
आवाज ऐकून तुझा
माणसं भेटायला तुला आली
तुला मायेने स्पर्श करून
छोटी बाळं..आनंदी झाली ..
तुही त्यांना मनमोकळी
दाद नाचत नाचत प्रेमाने दिली..
वर्षा मागून वर्षे गेली
दिवसाचे प्रहर ..या पट्याने तू
मला बांधून जखडून ठेवलसं
आणि एक दिवस उजाडला …..
तू पट्यातून ..तुझा गळा सोडवलास
माझ्या कुशीत तू झोपला होतास
मला तू..कायमचा सोडून गेलास
तुझा आवाज ..हा परिसर
कायमचा..मुकला ..गुलाब कोमजला
पूर्वी मला कसलीच काळजी नव्हती
कारण घरात माझ्या !माझी आई होती
तिच्यानंतर…. दारावर माझ्या
विघ्नहर्ता गणपती बसला होता
पण त्यापुढे रक्षणकर्ता!जोजो माझा
अठरा वर्षे घर सांभाळत होता
तो …माझ्या करता
देवापेक्षा मोठा होता…….!!
जोजो तुझ्या आवाजाच्या भासाने
आजही घर …कावरबावरं होत
घर पोरकं झालं रे…देवघरातील
दत्ताच्या डोळ्यात पाणी येत
जोजो..तुझ्या आठवणीन घर
आजही रडत..हुंदके देत….!!
बाबा ठाकूर
