You are currently viewing 15 जूनपर्यंत मान्सूनची गती मंदावणार; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी

15 जूनपर्यंत मान्सूनची गती मंदावणार; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी

15 जूनपर्यंत मान्सूनची गती मंदावणार; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी

मुख्यमंत्री कार्यालयाचा इशारा; कोकणात जोरदार पावसाची शक्यता, मात्र राज्यभर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम

मुंबई :

गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या उष्णतेमुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिक मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत मान्सूनच्या प्रगतीचा वेग आणि राज्यातील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यभर समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीसाठी पोषक ठरणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
उष्णतेचा कडाका कायम
किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणी टाळावी आणि हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसारच शेतीची कामे करावीत, असे सांगण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, अशी सूचनाही संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा