परुळेत भरधाव डंपरचा थरार; दोन पार्किंग कार चिरडल्या, मोठा अनर्थ टळला
आदिनारायण मंदिरासमोर अपघात; दर्शनासाठी गेलेले भाविक बचावले, चालकाच्या मद्यपान चाचणीवरून ग्रामस्थ आक्रमक
वेंगुर्ले
परुळे येथील श्री देव आदिनारायण मंदिरासमोर रविवारी सायंकाळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दोन कारना जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. धडकेनंतर डंपरने जुन्या बसथांब्यालाही धडक देत जवळील माड-पोपळी बागायतीत कोसळला. सुदैवाने दोन्ही कारमधील प्रवासी त्यावेळी मंदिरात दर्शनासाठी गेले असल्याने मोठा अनर्थ टळला.
केळूस येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. मंदार आरोसकर तसेच वेंगुर्ले येथील ओंकार सामंत हे आपल्या कुटुंबीयांसह श्री देव आदिनारायणाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला आपल्या गाड्या उभ्या केल्या होत्या. दरम्यान, कुडाळच्या दिशेने येणारा डंपर मंदिराच्या उतारावर भरधाव वेगाने आला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपरने दोन्ही कारना जोरदार धडक दिली.
या धडकेत हँडब्रेक लावून उभी केलेली एक कार तब्बल ७० फूटांहून अधिक अंतर फरफटत गेली. दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या पूर्णपणे चेंगरल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतल्याचेही सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच निवती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने हटविण्याची तयारी सुरू असताना वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांनी चालकाची अल्कोहोल चाचणी होईपर्यंत वाहने हटवू नयेत, अशी ठाम भूमिका घेतली.
चालकाच्या मद्यपान चाचणीस विलंब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ सोडले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दर्शनासाठी गेले आणि जीव वाचला!
डॉ. मंदार आरोसकर आणि ओंकार सामंत यांचे कुटुंबीय अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच कारमधून उतरून आदिनारायण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. अन्यथा हा अपघात जीवघेणा ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,” अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.
