You are currently viewing कुडाळात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा; भव्य सायकल रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Oplus_16908288

कुडाळात जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा; भव्य सायकल रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘माय भारत’ उपक्रम व ‘इन्स्पायर सायकल्स’च्या संयुक्त विद्यमाने आयोजन; आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कुडाळ :

युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ उपक्रम आणि ‘इन्स्पायर सायकल्स’ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुडाळकरांनी या उपक्रमात भरभरून सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. जयसिंग रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘इन्स्पायर सायकल्स’चे मालक रूपेश तेली, डॉ. प्रशांत सामंत, सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सिंधुदुर्गातील पहिले ‘आयर्न मॅन’ प्रमोद भोगटे, शिवप्रसाद राणे, डॉ. सौरभ पाटील आणि डॉ. बापू परब आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत कुडाळ शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली. ‘इन्स्पायर सायकल्स’च्या वक्रतुंड प्लाझा येथील दुकानापासून सुरू झालेली ही रॅली कुडाळ–ओरोस–कुडाळ अशा मार्गावर पार पडली. रॅलीमध्ये युवक-युवती, विद्यार्थी तसेच सायकलप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमादरम्यान सायकल चालविण्याचे विविध फायदे अधोरेखित करण्यात आले. नियमित सायकलिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहते, मानसिक प्रसन्नता मिळते तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होते, यावर वक्त्यांनी भर दिला. इंधन बचतीसोबतच सायकल ही किफायतशीर आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था असल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी रूपेश तेली यांनी युवकांना फिटनेससह सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. ‘माय भारत’च्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावली. उपस्थितांनी जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सायकलिंगला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संकल्प केला.

भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय तसेच ‘इन्स्पायर सायकल्स’ कुडाळ यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये आरोग्य, पर्यावरण आणि फिटनेसबाबत नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा