सुप्रसिद्ध सनदी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
अमरावती / (प्रतिनिधी) –
निवडणूक आयोगाच्या सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी तथा अमरावती जिल्ह्याची सुकन्या सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत (भा.प्र.से.) या येत्या शनिवार, दि. ६ जून रोजी चार दिवसांच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमरावती-वलगाव रोडवरील ‘सिकची रिसॉर्ट’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे’ भव्य उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. या विशेष संमेलनामध्ये नवोदित आय.ए.एस. विद्यार्थ्यांच्या गौरव व सत्कार सोहळ्याला देखील त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मूळच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री बानायत यांनी आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख निर्माण केली आहे. २०१२ च्या आय.ए.एस. बॅचमधील त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला सनदी अधिकारी असून, आपल्या कठोर परिश्रमातून त्यांनी हे यश मिळविले आहे. आपल्या उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्यासोबतच एक संवेदनशील लेखिका, कवयित्री आणि प्रगल्भ वक्त्या म्हणून त्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आपल्या या नियोजित दौऱ्यात त्या चार दिवस अमरावती जिल्ह्यात थांबणार असून या दरम्यान अमरावती, मोर्शी, हिवरखेड आणि वरुड या भागातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन त्या उपस्थितांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यात त्यांचा मुक्काम अमरावतीच्या शासकीय विश्रामभवनात असणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे बहुमोल मार्गदर्शन यानिमित्ताने लाभणार आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण संमेलनाचे अध्यक्षपद माजी सनदी अधिकारी अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर हे भूषविणार असून, दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा स्पर्धा परीक्षा विश्वासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. संमेलनाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे, अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित संगीताचा एक विशेष काव्यमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नामवंत गायकवृंद हा सांगीतिक सोहळा सादर करणार असून, या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील भाग्यश्री बानायत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या भव्य संमेलनाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी संचालित मिशन आयएएस, प्रेमकिशन सिकची चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्रिवेणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी, त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा आणि प्रशासनात जाण्याची नवी उमेद निर्माण व्हावी, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. अमरावती जिल्ह्याच्या या सुकन्येच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा, त्यांच्या संघर्षगाथेचा आणि मार्गदर्शनाचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ‘मिशन आयएएस’चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. पंजाबराव कथे, ‘मिशन आयएएस’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवेंद्र खडसे, राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामदास चवरे तसेच सिकची रिसॉर्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
