शिवसेना शिंदे गटाकडून जबाबदारी; सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
सावंतवाडी / बांदा :
शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेत सक्रियपणे कार्यरत असलेले धडाडीचे युवा कार्यकर्ते मोईन फिरोज खान यांची सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे बांदा परिसरासह युवा सेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या मोईन खान यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. निवडीचे अधिकृत पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सैफान खान, कैफ शेख, हर्षल कल्याणकर, भावेश शेटकर, सतवीर शेखावत आणि दिव्यम सावंत यांच्यासह युवा सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना मोईन खान यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने काम करून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
मोईन खान हे बांदा येथील सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेले अन्वर खान यांचे नातू आहेत. तसेच अन्वर खान हे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिसरात परिचित आहेत.
मोईन खान यांच्या निवडीचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून, “कर्तृत्वाची दखल, नेतृत्वाचा विश्वास; मोईन खान यांच्यावर युवा सेनेची महत्त्वाची धुरा” अशा शब्दांत त्यांच्या निवडीचे अभिनंदन करण्यात येत आहे.
