अवकाळी पावसग्रस्त आयर कुटुंबाला शिवसेनेकडून आर्थिक मदतीचा हात
मालवण
शनिवार, ९ मे रोजी आचरा येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे घराचे मोठे नुकसान झालेल्या श्रीमती मनीषा मनोहर आयर यांच्या कुटुंबाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे आणि आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी आर्थिक मदत केली.
सोमवारी आयर यांच्या निवासस्थानी भेट देऊन महेश राणे व जेरॉन फर्नांडिस यांनी श्रीमती मनीषा आयर यांच्याकडे रोख आर्थिक मदत सुपूर्द केली. ९ मे रोजी झालेल्या वादळी पावसात आयर यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे कुटुंबाचा संसार उघड्यावर आला होता.
आयर कुटुंबाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांनी घटनेनंतर तातडीने घराच्या छपरासाठी ताडपत्री उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर आता आर्थिक मदतीचा हात पुढे करत कुटुंबाला दिलासा दिला आहे.
या मदतीबद्दल श्रीमती मनीषा आयर व त्यांच्या कुटुंबीयांनी महेश राणे, जेरॉन फर्नांडिस तसेच शिवसेनेचे आभार मानले आहेत.
