विष्णू घाडी, जयेश नर, संदीप डोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; विकास, रोजगार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या प्रगतीचा दावा
देवगड / प्रतिनिधी :
विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख संदीप डोळकर, मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. नारकर, पंचायत समिती सदस्य सौ. चव्हाण, माजी सभापती रवी पाळेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी गाव, वाडी, तालुका आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले. जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा भाजपवरील वाढता विश्वास ही पक्षाची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विष्णू घाडी, जयेश नर, संदीप डोळकर तसेच अन्य कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राणे यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी पक्ष घेईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा सन्मान, त्यांचे नेतृत्व विकसित करणे आणि त्यांना काम करण्याची संधी देणे ही भाजपची परंपरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात नव्याने दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य मान-सन्मान दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात हजारो कोटी रुपयांचे औद्योगिक प्रकल्प येणार असल्याचा दावा केला. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक किंवा परराज्यात गेलेल्या युवकांना भविष्यात आपल्या जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत बोलताना त्यांनी सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक असतील, अशी ग्वाही दिली. कोकणचा निसर्ग, आंबा, काजू आणि शेती यांना कोणताही धोका पोहोचणार नाही याची सरकार काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखूनच प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विजयदुर्ग परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विजयदुर्ग परिसरात भाजपला नव्याने बळ मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
