You are currently viewing आडाळी एमआयडीसीतील मातीचोरीप्रकरणी तहसीलदार-पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; ‘नार्को टेस्ट’ची मागणी
Oplus_16908288

आडाळी एमआयडीसीतील मातीचोरीप्रकरणी तहसीलदार-पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; ‘नार्को टेस्ट’ची मागणी

१० दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन; संजू परब यांचा इशारा

सावंतवाडी | प्रतिनिधी :

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून राजरोसपणे खनिजसदृश मातीचे अवैध उत्खनन आणि चोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात दोडामार्गचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या संगनमताने व पाठबळानेच हा प्रकार सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची ‘नार्को टेस्ट’ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश केला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.

परब म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील एमआयडीसी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजसदृश मातीचे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या प्लॉटमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील माती चोरीला गेली आहे. एमआयडीसी हा शासनाचा अधिकृत प्रकल्प असून त्या ठिकाणी विनापरवाना खोदाई करणे आणि मातीची वाहतूक करणे हा पूर्णपणे बेकायदेशीर व गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

स्थानिक ग्रामस्थांनी तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या अवैध उत्खननाबाबत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. एवढा मोठा गैरप्रकार सुरू असतानाही तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप करत परब यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हे या मातीचोरीप्रकरणात गुंतलेले असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा केला.

प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की, एखादा गरीब ग्रामस्थ घरबांधणीसाठी थोडी वाळू काढताना आढळला, तर महसूल प्रशासन त्याच्यावर दीड-दोन लाख रुपयांचा दंड आकारते. मात्र शासनाच्या जागेतील इतक्या मोठ्या प्रमाणावरील मातीचोरी आणि अवैध उत्खनन महसूल व पोलीस प्रशासनाला दिसत नाही, हा मोठा प्रश्न आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा प्रकार होऊच शकत नाही. त्यामुळे या सर्व प्रकारासाठी जबाबदार धरून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांची ‘नार्को टेस्ट’ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

उद्योगमंत्र्यांशी चर्चा; १० दिवसांत कारवाईची मागणी

या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे संजू परब यांनी सांगितले. या प्रकरणात योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

मात्र येत्या दहा दिवसांत स्थानिक प्रशासनाने अवैध उत्खनन करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर ठोस कारवाई केली नाही, तर शिवसेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा थेट इशारा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा