You are currently viewing मोती तलावाला जागतिक पर्यटनाची झळाळी; सावंतवाडीच्या वैभवशाली भविष्याचा भव्य आराखडा जाहीर
Oplus_16908288

मोती तलावाला जागतिक पर्यटनाची झळाळी; सावंतवाडीच्या वैभवशाली भविष्याचा भव्य आराखडा जाहीर

व्ह्यू पॉईंट ते बोटिंगपर्यंत; मोती तलाव परिसर होणार आकर्षणाचे नवे केंद्र

१५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपत व्ह्यूईंग डेक, बोटिंग, फूड प्लाझा, फेस्टिव्हल मार्केट आणि ओपन ॲम्फीथिएटरची उभारणी; नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांची माहिती

सावंतवाडी :

सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडीच्या हृदयस्थानी असलेल्या मोती तलावाचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार असून त्याला नवसंजीवनी देण्याचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे मोती तलावाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे रूप मिळणार असून देश-विदेशातील पर्यटकांना सावंतवाडीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासंदर्भातील माहिती सावंतवाडीच्या नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते.

नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले म्हणाल्या की, मोती तलावाच्या विकासाबाबत आजवर रॉयल फॅमिली आणि शासन यांच्यात काही प्रमाणात मतभेद होते. मात्र आता सर्व मतभेद बाजूला ठेवून, सर्वांना सोबत घेऊन तलावाचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक विकास साधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी शासन स्तरावरून मोठा पाठिंबा मिळत असून माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी यापूर्वीच सावंतवाडीच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचेही या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.

राजवाड्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, मोती तलावाचे पाणी कायम स्वच्छ आणि नितळ राहण्यासाठी विशेष फिल्टर प्लांट उभारला जाणार आहे. त्यामुळे बाहेरील माती तलावात जाणार नाही आणि केवळ शुद्ध पाण्याचा पुरवठा तलावात होईल. तलाव परिसरातील ऐतिहासिक भिंतींचे संरक्षण करण्यात येणार असून तलावाचे मूळ ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

नव्या विकास आराखड्यानुसार तलाव परिसरात आकर्षक ‘व्ह्यूईंग डेक’ उभारण्यात येणार आहे. येथे नागरिक आणि पर्यटकांना बसून तलावाच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. याशिवाय तलावाच्या दिशेने ऐतिहासिक टच असलेली आकर्षक बैठक व्यवस्था करण्यात येणार असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

पर्यटकांच्या मनोरंजनासाठी मोती तलावात बोटिंग प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. तसेच खाऊ गल्लीलगतच्या आरक्षित भागात वाढ करून आधुनिक ‘फूड प्लाझा’ विकसित करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना मिळण्यास मदत होईल.

सावंतवाडीची ओळख ही ‘कलाकारांची भूमी’ म्हणून राहिली आहे. ही ओळख अधिक दृढ करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध ‘काला घोडा फेस्टिव्हल’ च्या धर्तीवर मोती तलाव परिसरात तरुण आणि होतकरू कलाकारांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. येथे कलाकारांना चित्रकला, हस्तकला आणि विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करता येईल. यामुळे रोजगाराच्या शोधात मुंबई, गोवा किंवा दिल्लीसारख्या शहरांकडे होणारे स्थानिक तरुण कलाकारांचे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल.

स्थानिक कला, संस्कृती आणि हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र ‘फेस्टिव्हल मार्केट’ उभारले जाणार आहे. तसेच राजवाड्यासमोरील भागात भव्य ओपन ॲम्फीथिएटरची विकसित केले जाणार आहे. येथे कोकणातील लोककला, दशावतार नाटके, पारंपरिक कंदील महोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. यामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल.

गणेश विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या तलावाच्या भागाचा ‘व्ह्यू पॉईंट’ म्हणून विकास केला जाणार आहे. पर्यटकांना तलावाचे विहंगम दृश्य अनुभवता यावे यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण विकास आराखडा रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि. आणि इंडेन एलएलपी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी आपल्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितले की, ३१ एकर क्षेत्रात विस्तारलेला मोती तलाव हा सावंतवाडीचा ऐतिहासिक अभिमान आहे. या तलावाला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, शहराबाहेरील आणि परदेशी पर्यटक सावंतवाडीमध्ये यावेत आणि स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोती तलावाच्या या भव्य आणि दूरदृष्टीपूर्ण विकास आराखड्यामुळे सावंतवाडीच्या पर्यटन, कला, संस्कृती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा