You are currently viewing क्रांतिकवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा जाहीर

क्रांतिकवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा जाहीर

क्रांतिकवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा जाहीर

‘नारायण सुर्वे पारितोषिक’ विजेत्या कवितेला १० हजार रुपये रोख पुरस्कार; ५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका स्वीकारणार

कणकवली

कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार आहे.

नारायण सुर्वे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुपुत्र होत. मुंबईच्या गिरणगावात हमाली करणाऱ्या, रस्त्यावर झोपणाऱ्या कष्टकऱ्यांचे जगणे त्यांनी आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’, ‘माझे विद्यापीठ’, ‘जाहिरनामा’ यांसारख्या संग्रहांतून त्यांनी शोषितांच्या वेदनेला क्रांतीची धार दिली. श्रमिकांचे जीवन, मुंबईची झोपडपट्टी, भुकेलेले जग आणि व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यामुळेच त्यांना ‘क्रांतिकारी कवी’ म्हणून ओळखले जाते. पद्मश्री, कबीर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

कवी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गुणवत्ताधारक जुन्या-नव्या कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कवितेवर कोणतेही विषयबंध नसून कोणताही कवी कोणत्याही आशयावरील दीर्घ कविता पाठवू शकतो. मात्र एका स्पर्धकाने फक्त एकच कविता पाठविणे आवश्यक आहे. कविता किमान २० पानांपेक्षा अधिक असावी.

स्पर्धेसाठी कविता पोस्टाने किंवा कुरिअरने पाठविणे बंधनकारक असून मान्यवर कवी व समीक्षक स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. परीक्षण प्रक्रियेत संस्थेचा कोणताही हस्तक्षेप राहणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

कविता पाठविण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२६ असून कविता पाठविण्याचा पत्ता : अजय कांडर, ‘अभंग’, कलमठ-गोसावीवाडी, कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०२ असा आहे. अधिक माहितीसाठी मो. ९४०४३९५१५५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा