सिंधुदुर्गनगरी :
आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व मागणीनुसार खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषि विभागाने व्यापक नियोजन केले असून जिल्ह्यात युरिया व संयुक्त खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली आहे. भात शेतीसह फळबागांसाठी मोठ्या प्रमाणावर खतांची गरज भासणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा खतटंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आगाऊ उपाययोजना केल्या आहेत.
कृषि विभागाच्या माहितीनुसार, खरीप हंगाम २०२६ साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यास ५५०० मे. टन युरिया तसेच ५२०० मे. टन संयुक्त खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी एप्रिल आणि मे महिन्यात आतापर्यंत २२७१.४ मे. टन युरिया व १२३८ मे. टन संयुक्त खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १९८६.७ मे. टन युरिया आणि २४५७.५ मे. टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध असून याशिवाय ४५० मे. टन युरियाचा संरक्षित साठाही राखून ठेवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात विशेषतः भात शेती व आंबा, काजू यांसारख्या फळबागांसाठी युरिया, संयुक्त खते व इतर रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन खतांचा पुरवठा सुरळीत राहावा आणि शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषि विभाग सातत्याने पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अनुदानित रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी खत विक्रेत्यांना POS मशीनद्वारे खत विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खत व बियाणे साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. तसेच खते व बियाणे खरेदी करताना अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, खरेदीचे पक्के बिल घ्यावे आणि बिलावरील लॉट नंबर व किंमत तपासून घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
