मोफत आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत, दशावतार आणि ऐतिहासिक चित्रपटांच्या माध्यमातून विविध उपक्रमांची रेलचेल
सावंतवाडी :
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास सावंत यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या वतीने केवळ शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात याची विशेष चर्चा रंगली आहे.
श्री. सावंत यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. वाढदिवस सोहळ्याची सुरुवात २७ मे रोजी रात्री ठीक १२ वाजता ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर केक कापून होणार आहे. त्याच ठिकाणी रसिक प्रेक्षकांसाठी भव्य महिला दशावतार नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य वाढदिवस दिनी म्हणजेच २८ मे रोजी दिवसभर सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे. सरमळे येथील रमाई नगर परिसरात चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार असून, विविध सामाजिक माध्यमातून मदतकार्यही केले जाणार आहे.
आरोग्य क्षेत्राला हातभार लावण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. २८ मे रोजी माजगाव येथील विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी ‘लॉरेन्स अँड मेयो’ यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात परिसरातील २५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे.
यासोबतच दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयातील महिला सुतिकागृहासाठी इंडक्शन मशीन आणि सात लिटरचा थर्मस भेट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयालाही उपयुक्त भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संध्याकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी असणार आहे. वेत्ये येथील कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात रात्री साडेआठ वाजता ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा दाखविण्यात येणार आहे. तसेच सोनुर्ली येथे रात्री दहा वाजता कुलघर रंगमंचावर भव्य दशावतार नाट्यप्रयोग रंगणार आहे.
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रांत सावंत मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.
