You are currently viewing शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार सोहळा संपन्न

शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार सोहळा संपन्न

पिंपरी (दिनांक : ०९ मार्च २०२४) :

महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना तसेच जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, आमदार गौतम चाबुकस्वार, भाजप महाराष्ट्र सचिव अमित गोरखे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, गजानन लोकसेवा बँकेचे अध्यक्ष योगेश बाबर, उद्योजक आबा नागरगोजे, महेंद्र पाटील, भीमसिंह राजपूत, प्रशांत पोमण, नामदेव पोटे, बाजीराव यादव, श्रीनिवास गुंजशेट्टी, प्रदीप पल्लाडे, सुधीर पाटील तसेच शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे यांच्या उपस्थितीत ट्रक कंपनीचे प्लॉन्ट हेड राजेश खन्ना, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्था संचालक अभय कोटकर आणि दुर्ग संवर्धक श्रमिक गोजमगुंडे यांच्या अनुक्रमे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे शिवशंभो स्त्री सन्मान २०२४ अंतर्गत कुमारी नंदिनी मोरे, कुमारी हर्षदा मोहिते, डॉ. मीनाक्षी सूर्यवंशी (क्रीडा), डॉ. मृदुला पुसाळकर, डॉ. चारुशीला गोरे, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. सायली वडजे (वैद्यकीय), कविता फड, लक्ष्मी कोकाटे, वैशाली मानगे, मंगल मोहळकर, मालिनी घारे, शीला झांबरे, रेश्मा जाधव, मनीषा पाटील (सामाजिक), वर्षा मुसळे, दर्शना पोलकम, सुवर्णा पल्लाडे, स्वप्ना धनोकर, अनसूया पल्लाडे, सुकन्या कुंजीर, रोहिणी परळीकर, सुनंदा पाटील (शैक्षणिक), सरिता चौधरी, मंगल भापकर, अर्चना सोनार, शांता चौधरी, माया जोशी (अध्यात्म), कुमारी यशोदा नाईकवडे (पत्रकारिता), अर्चना पाटील (प्रशासन), सिंधू बनगर (औद्योगिक), सीमा गांधी (साहित्य) यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “शिवशंभो फाउंडेशन परिसरातील नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक वर्षांपासून कटिबद्ध आहे, याचा मी साक्षीदार आहे. संस्कृती संवर्धनाचे संस्कार आपल्याला घरातूनच मिळतात. कार्यगौरव पुरस्कारार्थींचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींचा गौरव झाला, असे मला वाटते!” उमा खापरे यांनी, “भगवान शंकर हे स्वतः अर्धनारीनटेश्वर आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीतील स्त्रीचे स्थान अधोरेखित होते!” असे विचार व्यक्त केले. गौतम चाबुकस्वार यांनी, “शिवशंभो फाउंडेशनचा कार्यविस्तार प्रतिवर्षी वाढतो आहे!” असे गौरवोद्गार काढले; तर अमित गोरखे यांनी, “शिवशंभो फाउंडेशनच्या महोत्सवात आज पहाटेपासून सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे!” असे मत व्यक्त केले. केशव घोळवे यांनी प्रास्ताविकातून, “आज महाशिवरात्री आणि जागतिक महिलादिन असा दुग्धशर्करा योग आहे. सुमारे बावीस वर्षांपासून शिवशंभो महोत्सव आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या योगदानातून भव्य शिवालयाची उभारणी करण्यात आली!” अशी माहिती दिली. पुरस्कारार्थींच्या वतीने अभय कोटकर, वर्षा मुसळे आणि सीमा गांधी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ॲड. रूपाली तोरखडे, रेणुका हजारे, संजय देशमुख, राजेश हजारे, विद्याधर राणे, दत्तात्रेय भुसे, कैलास पोखरकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप तरटे आणि सविता बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा