You are currently viewing माडखोलमध्ये अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात आमरण उपोषण

माडखोलमध्ये अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात आमरण उपोषण

माडखोलमध्ये अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात आमरण उपोषण

विशाल राऊळ ग्रामस्थांसह तलाठी कार्यालयासमोर ठिय्या; महसूल प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

सावंतवाडी

माडखोल – सांगेली परिसरातील तेरेखोल नदीपात्रात गाळ उपसण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू, दगड व गोट्यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल राऊळ यांनी ग्रामस्थांसह माडखोल तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या परिसरात गौण खनिजाचे मोठे साठे करून अर्धवट पासच्या आधारे परराज्यात अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे अनेकवेळा लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सांगेली भागातील नदीपात्र परिसर, दुपायू ठिकाण, श्रीकृष्ण गोशाळेसमोरील जमीन, माडखोल – सांगेली सीमाभागातील नार्वेकर यांच्या जमिनीत तसेच वरकोंडवाडी येथे मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाळू, दगड व गोटे उपसा करून साठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय बांदुली येथे क्रशरद्वारे गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
या संदर्भात यापूर्वी उपोषण व आंदोलन करून महसूल प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आश्वासनांपलीकडे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप विशाल राऊळ यांनी केला. त्यामुळे संबंधित ठिकाणांची तातडीने पाहणी करून सखोल चौकशी करावी व रितसर अहवाल सादर करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांनी अवैध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी महसूल प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही विशाल राऊळ यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा