मोती तलाव फूटपाथ कामाची संजू परबांकडून पाहणी; जीर्ण पाईपांबाबत खबरदारीच्या सूचना
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन; वृक्षलागवडीचीही मागणी
सावंतवाडी
पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही सावंतवाडी येथील मोती तलाव परिसरातील पादचारी मार्ग (फूटपाथ) काम अद्याप अपूर्ण असल्याने माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी संबंधित कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी फूटपाथखालील सिमेंटचे पाईप अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने योग्य ती खबरदारी घेऊनच पुढील काम करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी नगरपरिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी उपस्थित होते.
मोती तलावाच्या काठावर सुरू असलेल्या फूटपाथ कामाच्या संथ गतीबाबत तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत संजू परब यांनी चिंता व्यक्त केली. आगामी पावसाळ्यात या परिसरात किंवा मुख्य रस्त्यावर पाणी तुंबणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
दरम्यान, नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी या मार्गावरील झाडांच्या समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यापूर्वी वादळात अशोकाची काही झाडे उन्मळून पडली होती. त्या ठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सध्या अस्तित्वात असलेली झाडे आगामी पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे कोसळू नयेत, यासाठी वन विभाग आणि नगरपरिषदेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
या पाहणी दौऱ्यावेळी नगरपरिषद बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे, मनोज राऊळ तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
