You are currently viewing भुईबावडा कॉपी प्रकरणाची चौकशी वेगात

भुईबावडा कॉपी प्रकरणाची चौकशी वेगात

भुईबावडा कॉपी प्रकरणाची चौकशी वेगात

बोर्ड व शिक्षण विभागाची दोन स्वतंत्र पथके केंद्रावर दाखल; शिक्षक, विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले

वैभववाडी

भुईबावडा येथील दहावीच्या कॉपी प्रकरणाची चौकशी आता अधिक वेगाने सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दोन स्वतंत्र चौकशी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बोर्डाकडून निवृत्त शिक्षणाधिकारी डी. जी. साळुंखे तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रभारी उपशिक्षण अधिकारी संजय माने यांच्या नेतृत्वाखाली आज भुईबावडा परीक्षा केंद्रावर सखोल चौकशी करण्यात आली.
या चौकशीदरम्यान संबंधित शिक्षक, केंद्रप्रमुख, सुपरवायझर तसेच विद्यार्थ्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले. केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी करण्यात आली. परीक्षा सुरू असताना बाहेरून कोणाला प्रवेश मिळू शकतो का, यासाठी केंद्र परिसराची पाहणी करण्यात आली. तसेच केंद्रावर ‘चोरवाट’ अथवा अन्य मार्गाने प्रवेशाची शक्यता तपासण्यात आल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, संपूर्ण चौकशी प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडत असून चौकशी अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभाग व कोकण बोर्डाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतरच संबंधितांवर दोष निश्चित करून पुढील कारवाई होणार असल्याचे समजते.
भुईबावडा केंद्रावरील या कॉपी प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून या घटनेचे पडसाद तालुकाभर उमटताना दिसत आहेत. चौकशी पथकाने आज केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा