वैभववाडीतील १० वीच्या परीक्षेत शिक्षकांकडूनच कॉपीचा ‘बाजार’!
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा – शिवसेनेचा खणखणीत इशारा.
वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका हा कष्टाळू विद्यार्थ्यांचा आणि ‘कोकण पॅटर्न’चा अभिमान बाळगणारा तालुका आहे. आजपर्यंत येथील शिक्षण क्षेत्राला कॉपीचे गालबोट कधीही लागले नव्हते. मात्र, स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवणाऱ्या काही भ्रष्ट प्रवृत्तींनी दहावीच्या परीक्षेत चक्क विद्यार्थ्यांचे पेपर स्वतः लिहून जो भयंकर आणि लाजिरवाणा प्रकार केला आहे, तो अत्यंत संतापजनक आणि अक्षम्य आहे. हा प्रकार म्हणजे प्रामाणिकपणे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे!
या नीच कृत्यामुळे वैभववाडी तालुक्याची आणि आमच्या जिल्ह्याची प्रतिमा संपूर्ण राज्यात मलीन झाली आहे. शिक्षण क्षेत्राला लागलेली ही कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे. शिक्षण विभागाने नुसती चौकशीचा फार्स करू नये. या कॉपी रॅकेटमध्ये सामील असलेल्या सर्व शिक्षकांवर आणि संबंधित केंद्र प्रमुखांवर तात्काळ ‘फौजदारी गुन्हे’ दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी आमची ठाम मागणी आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढावीत. जर या प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्याचा किंवा कारवाईत हयगय करण्याचा प्रयत्न झाला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आणि रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडू, याची प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने गंभीर दखल घ्यावी!
गुलजार काझी
वैभववाडी तालुका सचिव,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
