राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडीत काँग्रेसतर्फे आदरांजली
माहिती तंत्रज्ञान व पंचायती राज व्यवस्थेतील योगदानाचे स्मरण
सावंतवाडी
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय Rajiv Gandhi यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली व पुष्पांजली वाहण्यात आली. २१ मे १९९१ रोजी झालेल्या त्यांच्या अकस्मात निधनाने देशाचे आणि काँग्रेस पक्षाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील विविध विकासकामांचे स्मरण केले. देशात माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्रांती घडवून आणणे, १८ वर्षांवरील युवकांना मतदानाचा अधिकार देणे तसेच पंचायती राज व्यवस्था अधिक सक्षम करून आधुनिक भारताचा पाया रचण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रांतिक सदस्य दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, सुभाष नाईक, बाब्या म्हापसेकर, सुधीर मल्हार, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, संजय लाड, पीटर फर्नांडिस, इनास माडतीस, प्रज्ञा चौगुले आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
