You are currently viewing कुडाळमध्ये मुक्ताई अकॅडमीच्या कॅरम-बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १२४ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
Oplus_16908288

कुडाळमध्ये मुक्ताई अकॅडमीच्या कॅरम-बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १२४ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

काका कुडाळकर यांच्या हस्ते उद्घाटन; राज्य-राष्ट्रीय स्तरावर यशस्वी मुक्ताई अकॅडमीच्या उपक्रमाचे कौतुक, विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण

कुडाळ : लहान मुलांमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ या बौद्धिक खेळांची आवड निर्माण करून त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी येथील मुक्ताई अकॅडमीच्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमच कुडाळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात पाच वर्षांवरील एकूण १२४ मुला-मुलींनी सहभाग घेतला. कुडाळ शहर, तालुका तसेच कणकवली येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून कॅरम आणि बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक धडे आत्मसात केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी लहान मुलांसाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे मुक्ताई अकॅडमीच्या वतीने नियमितपणे आयोजित केली जातात. यंदा प्रथमच कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन शहरातील ज्येष्ठ क्रीडाप्रेमी काका कुडाळकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी मुक्ताई अकॅडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, आर. एल. परब सर, संवाद मिडिया न्यूज चॅनलच्या ब्युरो चीफ विभावरी परब, सीए श्रीमती वालावलकर, उन्मेष शेट्ये, केंद्रप्रमुख श्री. वारंग सर, अनंत राणे, गुरुप्रसाद सावंत, मार्गदर्शक मयुरेश मालवणकर, समीर राऊळ सर, तसेच धामापूरकर सर आणि आगलावे सर उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतचे गटनेते विलास कुडाळकर यांनीही शिबिराला विशेष भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनप्रसंगी बोलताना काका कुडाळकर यांनी मुक्ताई अकॅडमीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, मुलांना खेळाची आवड असेल तर पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. कमी वयातच अनेक विद्यार्थी कॅरम आणि बुद्धिबळामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत असल्याचे सांगत, योग्य मार्गदर्शनासाठी मुक्ताई अकॅडमी आणि कौस्तुभ पेडणेकर यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक तथा कौस्तुभ पेडणेकर यांचे वडील कै. सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांनी तब्बल २५ वर्षे कॅरम खेळासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांचा वारसा कौस्तुभ आणि बाळकृष्ण पेडणेकर समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगत, मुक्ताई अकॅडमीने भविष्यात जिल्ह्याला एक ग्रँडमास्टर घडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच अकॅडमीला लागेल ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमात मार्गदर्शक मयुरेश मालवणकर यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्त्व, प्राथमिक तंत्रे आणि खेळातील रणनीती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम खेळातील विविध बारकावे, तांत्रिक बाबी आणि सरावाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच कॅरम व बुद्धिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, अकॅडमी, शाळा आणि विविध असोसिएशनतर्फे आयोजित होणाऱ्या स्पर्धा, त्यातील गुणांकन पद्धती, त्यातून मिळणारे लाभ आणि खेळातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी मुक्ताई अकॅडमीच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, मागील दहा वर्षांपासून अकॅडमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा आणि विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. अकॅडमीचे अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शालेय तसेच असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये पारितोषिक विजेते ठरले आहेत. अकॅडमीच्या ३२ विद्यार्थ्यांनी बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले असून, सलग तीन वर्षे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील “बेस्ट अकॅडमी” पुरस्कार मिळवणारी कोकणातील ही एकमेव अकॅडमी असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मागील महिन्यात अकॅडमीचे विद्यार्थी बाळकृष्ण पेडणेकर (सावंतवाडी) आणि मयुरेश मालवणकर (मालवण) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ असोसिएशनचे राज्य पंच (आर्बिटर) झाले. या उल्लेखनीय यशाबद्दल मयुरेश मालवणकर यांचा काका कुडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन समीर राऊळ सर यांनी केले. शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा