*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*ऋतू*
दिवसामागूनदिवस चालले ऋतूमागुनी ऋतू…..आठवतंय ना गीत…?
ऋत है मीलनकी साथी मेरे आरे…
बालपणी बालभारतीत शिकलेली सहा ऋतूंची कविता…सगळं आठवायला लागतं….निसर्गाने सहा ऋतू निर्माण केले त्यामागे सृष्टीचं नेमेची होणारं परिवर्तन…
बदल हा निसर्गाचा अविभाज्य अंग आहे.बदलघडले नसते तर सारं वातावरण एकसुरी भासलं असतं, मनाला मरगळ आली असती…विविधता बघत,अनुभवतच आपला दिवस चैतन्यमय होतो.. शिशिर .ग्रीष्मात सारी सृष्टी पानगळीने उसासा टाकते… सोनेरी ऊन झेलत वसंत येतो व तांबडी हिरवी लुसलुशीत पालवी फांदीवर झुलतांना दिसते.
तीव्र उन्हात गुलमोहर, बहावा, मोगरा बहरून येतात. कष्टसाध्य जगण्यातील आनंदाची जणू प्रेरणा देतात. कलिंगड आंबे, द्राक्ष रानमेवा रसनेला तृप्ती देतात..
तप्त धरेला शिडकावा देत मृद्गंध दरवळत आषाढ व मागोमाग श्रावण…ऊन सावलीचा लपंडाव व रिमझिम पाऊस धरेला आनंद देतो तसेच पशुपक्षी प्राणी व मानवालाही चैतन्यात न्हाऊ घालतो.धरा तृप्त होत पोटात अंकूर रूजवते व हिरवागार रोपांचा शालू परिधान करते….
कळ्या फुलं फळांनी रान मोहरतं,बहरतं…पक्षांचा किलबिलाट मधमाशा,फुलपाखरं,चिमण्यांचे थवे …सर्वत्र नवचैतन्याला जणू उधाण येतं…पावसात भिजलेले काळेशार कातळ,पहाडातून वहाणारे धबधबे,खळाळत झेपावत वहाणारे जलप्रवाह…नदीचा वाहता आवाज ववार्याचे संगीत…तनमन प्रफुल्लीत करतं…प्रेमी युगुलांना
विरह असह्य करणारा तर जवळ
प्रिया असलेला प्रियकर पावसाला धन्यवाद देणारा…
सण समारंभ आनंदाची रेलचेल
म्हणजे चिंब पावसाळा…हवाहवासा ऋतू…
आणि हिवाळ्याची चाहूल हवेत गारठा वाढताच होते…पहाटे पहाटे पांघरूणात स्वत:ला गुरफटून जागं राहून निद्रेची अनुभूती घेण्याची लज्जत काही औरच…हळूहळू शेकोटी,उबदार वस्रांत गारव्याचा स्पर्श सुखद होतो..दसरा दीपावली चैतन्य ,समृध्दी लेवून येते.. हेमंत सरता पुन्हा ऋतूंची उजळणी…..
हे रहाटगाडगं अखंड चालतं म्हणून सृष्टीत चैतन्य आहे,बहर आहे,मनमोहक रंग आहेत,ढग वारं,पाणी आहे.नाविन्याचे स्रोत आहेत.
स्वच्छनिळं आकाश तसेच काळेभोरमेघही आहेत.हे ऋतूव त्यातील बदल निरखतांना कोणता एक ऋतू आवडता कसा
सांगावा? सगळे ऋतू भरभरून जगावे व त्या चैतन्याशी एकरूप व्हावं…!
~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार✍️
